राम शिंदे यांच्याविरुद्ध पुतण्याने थोपाटले दंड; चौंडी ग्रामपंचायतीत शिंदेचा लागणार ‘कस’

वसंत सानप 
Monday, 28 December 2020

माजी मंत्री राम शिंदे यांच्याविरुध्द त्यांचे पुतणे अक्षय शिंदे यांनी दंड थोपटल्यामुळे चौंडी (ता. जामखेड) ग्रामपंचायत निवडणूकीत त्यांचा राजकीय 'कस' लागणार आहे.

जामखेड (अहमदनगर) : माजी मंत्री राम शिंदे यांच्याविरुध्द त्यांचे पुतणे अक्षय शिंदे यांनी दंड थोपटल्यामुळे चौंडी (ता. जामखेड) ग्रामपंचायत निवडणूकीत त्यांचा राजकीय 'कस' लागणार आहे. येथील निवडणूक पक्षपातळीवर नसून समविचारी कार्यकर्त्यांनाबरोबर घेऊन दोन पँनल समोरासमोर उतरुन सरळ लढत होईल, असे चित्र आहे.

प्रत्यक्षात उमेदवारी माघारनंतर पँनलचा निघणारा जाहिरनामा, पोस्टर्स, पँम्पलेटवर कोणाचे नेतृत्व दर्शविणारे फोटो टाकले जातात यावरच पक्षीय राजकारण स्पष्ट होईल. असे असले तरी निवडणूक पूर्वतयारी जोरात सुरु आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पँनलला त्यांचेच पुतणे आहिल्यादेवीचे वंशज अक्षय शिंदे यांनी समविचारी कार्यकर्त्यांनाबरोबर घेऊन आवहान दिले आहे. त्यामुळे चौंडीची निवडणूक बिनविरोध होणार नाही, अशी स्थिती आहे. चौंडी राजमाता आहिल्यादेवीचे जन्मगाव; देशाच्या नकाशावर ठळकपणे ओळखले जाते. याच ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून राम शिंदेंच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली होती.

त्यामुळे येथील ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण महत्व आहे. मागील वेळी माजी मंत्री शिंदेंनी यांनी येथील निवडणूक बिनविरोध केली होती. यावेळी मात्र निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणूकीची चिन्हे दिसत नाहीत.

माजी मंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पँनलची धुरा विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन विलास जगदाळे, माजी उपसरपंच पांडूरंग उबाळे,दत्तात्रेय भांडवलकर यांच्या खांद्यावर असून समविचारी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पँनल तयार केले आहे. तर माजी मंत्री शिंदेंचे कट्टर विरोधक व त्यांचे पुतणे अक्षय शिंदे यांनी स्थानिक राजकारणात माहिर असलेले माजी सरपंच अशोक देवकर, अविनाश शिंदे या जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुनील उबाळे, गणेश उबाळे यांच्यासह समविचारी  कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तगडे अवहान देण्याची तयारी केली आहे.

चौंडीची ग्रामपंचायत प्रतिष्ठेची समजली जाते. येथून माजी मंत्री राम शिंदे च्या राजकीय प्रवासाची सुरुवात झालेली आहे. ते एकवेळा सरपंच राहिले होते.दुसऱ्या 'टर्म' ला शिंदेंचा ग्रामपंचायतीला पराभव झाला. तदनंतर त्यांच्या सौभाग्यवती आशाताई शिंदे पंचायत समितीला जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आल्या सभापती झाल्या अन् पुढे शिंदे आमदार झाले. त्यांना आमदार असताना येथील ग्रामपंचायतीच्या सत्तेपासून अशोक देवकरांनी रोखले होते.सत्ता देवकरांच्या हाती होती. मात्र मंत्री असताना सर्वांच्यात मेळ घालून माजी मंत्री शिंदेंनी निवडणूक बिनविरोध केली होती. यावेळी ही शिंदे पुन्हा बिनविरोधचा कित्ता गिरवतील, असा राजकीय अन्वयर्थ लावला जातो आहे. मात्र निवडणूक बिनविरोध झाली नाही तर राज्यात लक्षवेधी ठरेल हे मात्र नक्कीच..!

चौंडीच्या राजकारणात अशोक देवकर ठरणार किंगमेकर
चौंडीच्या राजकारणात माजी सरपंच अशोक देवकारांची भूमिका मागील पंचवीस वर्षांपासून कायम महत्वाची ठरलेली आहे.त्यांनी ठरविले तर येथे काही ही घडू शकते,सर्वसामान्यांचा मोठा जनाधार त्यांच्या पाठीशी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शिंदे चुलत्या पुतण्यांचे लक्ष अशोकराव देवकरांवर केंद्रित राहते. प्रथमदर्शनी देवकर अक्षय शिंदें सोबत दिसत असले तरी प्रत्यक्ष  ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या नंतरच स्पष्ट होईल .अन् निवडणूक कोणत्या वळणावर न्यायची तेही देवकरांच्या भूमिकेवरच अवलंबून राहणार आहे.हे मात्र निश्चित..! 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram Shinde vs Akshay Shinde in Choundi Gram Panchayat