रामदास कैकाडी महाराजांच्या निधनाने नगरवर शोककळा

Ramdas Kaikadi Maharaj passed away
Ramdas Kaikadi Maharaj passed away

नगर : संत कैकाडी बाबांचे पुतणे आणि येथील संत कैकाडी महाराज पुण्यधाम मठाचे विश्वस्त, प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. रामदास महाराज कैकाडी (जाधव) (वय 77) यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायामध्ये शोककळा पसरली आहे. महाराज हे मूळ नगर जिल्ह्यातीलच असल्याने त्यांचा येथे ऋणानुबंध होता. पुरोगामी चळवशीसोबत त्यांचे अतूट नाते होते.

मागील पंधरा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर अकलूज येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. 25) दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.

मांडवगण (ता. श्रीगोंदे, जि. नगर) हे त्याचे मूळ होते. तर, मनमाड (जि. नाशिक) हे त्यांचे जन्मगाव होते. वारकरी सांप्रदायामध्ये त्यांना मानाचे स्थान होते. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांची नितांत श्रद्धा होती. संत गाडगेबाबा आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा पगडा होता.

समाजातील अंधश्रद्धा, बुवाबाजी याविषयी ते आपल्या कीर्तनातून परखडपणे मत मांडत असत. संत तुकाराम महाराज बीजेच्या निमित्ताने देहू ते पंढरपूर अशी विठ्ठल पालखी रथ सोहळ्याची परंपरा त्यांनीच सुरू केली होती. ते विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे काही वर्ष अध्यक्ष तर, दहा वर्षे सदस्य होते. नगर जिल्ह्यातील प्रत्येक अध्यात्मिक कार्यक्रमास त्यांची आवर्जून हजेरी असायची.  

महाराजांनी पालखी यात्रा काढली होती. त्याचा प्रमुखच मी होतो. त्यांच्याविषयीच्या आठवणी शब्दांत सांगणे कठीण आहे. नगर जिल्ह्याचे तसेच पुरोगामी वारकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.

- भगवानदास घुगेशास्त्री, पाथर्डी

मराठा सेवा संघ आणि त्याचे अतूट नाते होते. मराठा सेवा संघाच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. 
त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुरोगामी वारकरी चळवळीचा दीपस्तंभ हरपला.

- अजय बारस्कर महाराज, नगर

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com