नगरची लालपरी पोहचली मुंबईकरांच्या दारी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

राज्यात आता एसटी महामंडळासह मुंबईतील बेस्ट बसच्या वाहतुकीस परवानगी मिळाली आहे. राज्यात एसटीला म्हणावा तसा प्रतिसाद अद्याप मिळत नसल्याचे चित्र आहे.

नगर ः राज्यात पूर्ण क्षमतेने एसटी सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. रेल्वेप्रवासावर मात्र अजूनही काही प्रमाणात निर्बंध आहेत. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांना बेस्ट बसवर अवलंबून राहावे लागत आहे. बेस्ट बसची संख्या कमी पडू लागल्याने, एसटी महामंडळाच्या बस घेऊन मुंबईकरांची प्रवासाची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी नगर विभागाच्या सुमारे 100 बस दिल्या आहेत. 

राज्यात आता एसटी महामंडळासह मुंबईतील बेस्ट बसच्या वाहतुकीस परवानगी मिळाली आहे. राज्यात एसटीला म्हणावा तसा प्रतिसाद अद्याप मिळत नसल्याचे चित्र आहे. मात्र, मुंबईत रेल्वेसेवा विस्कळित असल्याने प्रवाशांना बेस्ट बसवरच अवलंबून राहावे लागते. प्रवाशांची संख्या मोठी असल्याने बस अपुऱ्या पडू लागल्या. त्यामुळे त्यांनी एसटी महामंडळाची मदत घेतली आहे. 

नगर विभागीय कार्यालयातील एकूण साडेसहाशेपैकी जिल्ह्यांतर्गत 48 बसच्या माध्यमातून 221, आंतरजिल्हा 163, बसच्या माध्यमातून 390 व आंतरराज्य चार बसच्या माध्यमातून चार फेऱ्या होत आहेत. उर्वरित बसमधून 100 बस मुंबईकरांच्या प्रवासासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यासाठी 100 चालक व तेवढेच वाहक पाठविले आहेत. प्रत्येक चालकाला आठ दिवसांची ड्यूटी दिली आहे. पुढील आठवड्यात अन्य कर्मचाऱ्यांना ड्यूटीवर मुंबईत पाठविले जाते. या सर्व कर्मचाऱ्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था प्रशासनाने मुंबईतच केली आहे. 

स्टार हॉटेलमध्ये मुक्काम 
मुंबईत बेस्टच्या बस कमी पडत असल्यामुळे, एसटी महामंडळाकडे "बेस्ट'ने बसची मागणी केली आहे. त्यानुसार एसटीने राज्यभरातून बस उपलब्ध करून दिल्या आहेत. बसचालक व वाहकांसह अन्य अधिकाऱ्यांना प्रथमच स्टार हॉटेलमध्ये मुक्कामाची संधी मिळाल्याने, त्यांनी आनंद व्यक्त केला. 

 

मुंबईत "बेस्ट'च्या मदतीसाठी नगरमधून 100 बस पाठविल्या आहेत. तेथे कार्यरत असलेल्या नगरच्या सर्व कर्मचाऱ्यांची राहण्याची, जेवणाची सोय केली आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे. 
- विजय गिते, नियंत्रक, नगर विभाग 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The red of the city reached the doors of Mumbaikars