जामखेडमधील खर्डा चौकाचा श्‍वास मोकळा; दोन वर्षापासून रखडलेल्या कामाला मुहूर्त

वसंत सानप
Sunday, 27 December 2020

अखेर बांधकाम विभागाला मूहर्त सापडला आणि दोन वर्षापासून रखडलेल्या खर्डा चौक ते लक्ष्मी चौकापर्यंत कामासाठी बांधकाम विभागाने मोठा फौजफाटा घेऊन पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणे काढली.

जामखेड (अहमदनगर) : अखेर बांधकाम विभागाला मूहर्त सापडला आणि दोन वर्षापासून रखडलेल्या खर्डा चौक ते लक्ष्मी चौकापर्यंत कामासाठी बांधकाम विभागाने मोठा फौजफाटा घेऊन पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणे काढली. त्यामुळे चौक व परिसर सुसज्ज झाला. गुदमरलेला श्वास मोकळा झाला आहे. वेळीच खर्डा चौकाचे सुशोभीकरण केले तर ठीक अन्यथा पुन्हा 'बे' पाढे ठरलेले.

खर्डा चौक ते खर्डा असा वीस किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी सहा कोटी रुपये मंजूर होते करमाळा चौक ते खर्डा पर्यंत रस्ताही झाला पण लक्ष्मी चौक ते खर्डा चौकापर्यंत सुमारे साडेपाचशे मीटर रस्त्याचे काम रखडले होते. यासंदर्भात आमदार रोहित पवारांनी अधिकार्यांना चांगलेच खडसावले. स्वतः संपूर्ण रस्त्याची पहाणी करुन आवश्यक त्या सूचना केल्या तरीही अधिकार्यांना घाम फुटेल तर नवल.तब्बल नऊ महिण्यांचा कालावधी उलटला तेंव्हा कुठे या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आणि रस्त्याच्या कामात आडसर ठरणारे अतिक्रमण काढण्याचा रविवारी( ता.27) रोजी मूहर्त सापडला.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
काही दिवसांपूर्वी गटाराचे काम झाले नंतर बरेच दिवस काम रखडले होते तेव्हा परत अतिक्रमण झाले होते. बांधकाम विभागाने चार महिन्यांपूर्वी अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावल्या होत्या पण अतिक्रमणे काढण्यात आली नव्हती खर्डा चौकाचे सुशोभित करण्यासाठी व रस्ता प्रश्न मार्गी लागण्यासाठी बांधकाम विभागाने आज पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे हटविले खर्डा चौकात उपलब्ध जागेनुसार सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

तर पुढे रस्त्याच्या मध्यापासून साडेपाच – साडेपाच मीटर दोन्ही बाजूला म्हणजे अकरा मीटर डांबरीकरण करण्यात येणार आहे. यामुळे रहदारीची समस्या सुटणार आहे. खर्डा चौकात मोठ्या प्रमाणावर रहदारीची समस्या निर्माण होत होती ती आता सुटणार आहे. खर्डा चौकापासून ते लक्ष्मी चौकापर्यंत दुभाजक टाकावेत अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे.

पुर्वी हा रस्ता फक्त सात मिटर एवढा रुंद होता. आता या रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूने साडेपाच मीटर एकूण अकरा मीटर रुंदीकरण होणार आहे. दोन्ही बाजुने एक मीटरच्या साइडपट्या व नालीचे काँक्रीटकरण होणार आहे. तर लक्ष्मी चौकापासून पुढे खर्ड्यापर्यंत उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे. जामखेड ते खर्डा रोड हा हैद्राबादहून शिर्डीकडे जाण्यासाठी साईभक्तांना जवळचा रस्ता आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस वाहतुक असते. त्यामुळे रस्त्याचा दर्जा आणि गुणवत्ता चांगली रहावी,याची दक्षता संबंधित विभागाला घ्यावी लागेल. दरम्यान आता या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम होणार असल्याने प्रवाशांना व वहातूक चालकांना दिलासा मिळणार आहे.

आज बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे हटवली यावेळी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शशिकांत सुतार,  सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या सह मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Removed encroachment at Kharda Chowk in Jamkhed