पारनेर नगरपंचायत निवडणूक; बहुरंगी लढतीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parner Election

पारनेर नगरपंचायत निवडणूकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

sakal_logo
By
मार्तंड बुचडे

पारनेर (जि. अहमदनगर) : पारनेर नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार व विधानसभेचे उपसभापती विजय औटी व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तसेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील भारतीय जनता पक्षाचे स्वतंत्र उमेदवार उभे करणार, की शिवसेनेला मदत करणार, यावर विजयाचे गणित बरेचसे अवलंबून आहे.

पूर्वीचे निवडून आलेले अपक्ष नगरसेवक पुन्हा एकदा स्वतंत्र विकास मंडळ तयार करून निवडणुकीत उतरले तर मात्र नगरपंचायतीत बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे. निकालही धक्कादायक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी ही निवडणूक होत असून, त्यासाठी एक डिसेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात होत आहे. २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. दुसऱ्या दिवशी २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

पारनेर नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर ही दुसरीच निवडणूक आहे. पहिली निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. त्या वेळी कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने अपक्षांच्या मदतीने शिवसेनेचे तत्कालीन आमदार विजय औटी यांनी सत्ता स्थापन केली होती. शिवसेनेच्या सीमा औटी प्रथम अडीच वर्षे नगराध्यक्ष होत्या. त्यांची मुदत संपल्यावर पुढील अडीच वर्षांसाठी निवडीदरम्यान मोठ्या नाट्यमय घटना घडल्या. त्यावेळी अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसनेचे काही नगरसेवक फोडून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या वर्षा नगरे यांनी बाजी मारत नगराध्यक्षपद मिळविले होते. मात्र, निवड झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यातही कुरबुरी सुरू झाल्या, त्यामुळे नगरे यांनी पुन्हा शिवसेनेचे माजी आमदार औटी यांच्या मदतीने कसेबसे आपले पद शेवटपर्यंत टिकवले होते.

हेही वाचा: अहमदनगर महापालिकेत पोटनिवडणुकीचे बिगुल; २१ डिसेंबरला निवडणूक

नगरपंचायतीसाठी पहिली निवडणूक २०१५ मध्ये झाली. त्या वेळी शहराचे मतदान सुमारे आठ हजार सातशे होते. आता मात्र त्यात वाढ होऊन ११ हजार आठशे दहा आहे.

त्यावेळचे पक्षीय बलाबल असे - शिवसेना ९, अपक्ष ५, राष्ट्रवादी काँग्रेस २, काँग्रेस १. मात्र, निवडणूक झाल्यावर अडीच वर्षांनंतर निवडून आलेले शिवसेनेचे तीन व अपक्ष दोन, असे पाच नगरसेवक फुटून राष्ट्रवादी काँग्रेसला जाऊन मिळाले होते. त्याचा मोठा इतिहास झाला. याची दखल थेट पक्षांनी राज्यपातळीवर घेतली होती. शेवटी मुख्यमंत्री पातळीवर समेट घडवून शिवसेनेच्या नगरसेवकांची पुन्हा घरवापसी झाली. मात्र, ती फक्त कागदोपत्री झाली. मनाने ते नगरसेवक पुन्हा शिवसेनेत आलेच नाहीत.

स्वच्छ प्रतिमा असलेला, सरकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविणारा व प्रभागातील जनतेच्या समस्या सोडविणारा नगरसेवक असावा, तसेच जनतेच्या अडीअडचणी सोडविणाऱ्या नगरसेवकास तरुणांनी मतदान करावे.
- निशा शिंदे, नवमतदार, नगरपंचायत

हेही वाचा: Truecaller मध्ये येतायत व्हिडिओ कॉलर आयडीसह अनेक भन्नाट फीचर्स

loading image
go to top