esakal | सेवानिवृत्त शिक्षकाने नऊ हजार पानांची हस्तलिखित ज्ञानेश्वरी केली माऊलींच्या चरणी अर्पण
sakal

बोलून बातमी शोधा

Retired teacher presents 9000 page manuscript at Dnyaneshwari

संवत्सर येथील सेवानिवृत्त शिक्षक रंगनाथ किसन डहाळे (वय 76 ) यांनी लॉकडाऊन काळात नऊ हजार पानांची हस्तलिखित ज्ञानेश्वरी प्रत तयार करून माऊलींच्या चरणी शिक्षक दिनी अर्पण केली आहे.

सेवानिवृत्त शिक्षकाने नऊ हजार पानांची हस्तलिखित ज्ञानेश्वरी केली माऊलींच्या चरणी अर्पण

sakal_logo
By
मनोज जोशी

कोपरगाव (अहमदनगर) : तालुक्यातील संवत्सर येथील सेवानिवृत्त शिक्षक रंगनाथ किसन डहाळे (वय 76 ) यांनी लॉकडाऊन काळात नऊ हजार पानांची हस्तलिखित ज्ञानेश्वरी प्रत तयार करून माऊलींच्या चरणी शिक्षक दिनी अर्पण केली आहे. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख हरि भक्त परायण गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथाची विधीवत पूजा करण्यात आली.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
प्राचार्य डॉ. आर. एच. शिंदे यांनी डहाळे यांना हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहिण्याची प्रेरणा दिली, त्याप्रमाणे त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला. डहाळे यांनी सेवानिवृत्तीनंतर तालुक्यातील कोकमठाण येथील रामदासी बाबा यांच्या जीवन कार्याचा चिकित्सक अभ्यास करून त्यावर कृष्णा गोदाकाठचे योगी रामदासी बाबा, तीन खणीचा रामानुभव, रामदासी बाबा आणि समर्थ विचारधारा या तीन पुस्तकांचे लेखन करून त्याचे लोकार्पण केले आहे. डहाळे यांना संत साहित्याचे वाचन करून त्याचा अभ्यास करण्याचा छंद आहे. त्यांनी अलीकडेच संत नरहरी सोनार साहित्याचा अभ्यास करून त्यावर चौथ पुस्तक नुकतेच प्रकाशित केले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून संत ज्ञानेश्वर माऊलींचे रचनास्थान असलेल्या नेवासा येथील "पैस"खांबास ही हस्तलिखित केलेली ज्ञानेश्वरी अर्पण केली.संपूर्ण ज्ञानेश्वरी हस्तलिखित करण्यासाठी रंगनाथ डहाळे यांनी जून 2020 पासून प्रारंभ केला, या कालावधीत त्यांनी 9 हजार 10 पाने हस्त लिखित केली. मंदिर देवस्थानचे प्रमुख ह भ प शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते डहाळे यांचा सत्कार करण्यात आला., यावेळी युवा चित्रकार सत्यजित उदावंत,अंबादास महाराज भागवत गुरुजी,गोरख भराट,संदीप आढाव उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर