पाय धुण्यासाठी नदीत गेलेला रिक्षा चालक क्षणातच बेपत्ता

मार्तंड बुचुडे
Wednesday, 21 October 2020

निघोज कुंड येथील कुकडी नदीच्या प्रवाहामध्ये रिक्षाचालक पाय धुण्यासाठी गेला.

पारनेर (अहमदनगर) : निघोज कुंड येथील कुकडी नदीच्या प्रवाहामध्ये रिक्षाचालक पाय धुण्यासाठी गेला. तो शेवाळ व कुकुडी नदीला जोराचा वाहात असलेला पाण्याचा प्रवाह यामुळे पाय घसरून कुकुडी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भिती व्यक्त होत आहे. ही माहीती समजताच पारनेर पोलिसांनी काल (ता. 20) रात्रीपासूनच  शोध सुरू केला आहे. मात्र त्यचा अद्यापही शोध लागला नाही.

मंगळवारी (ता. 20) सायंकाळी पाच वाजणेच्या सुमारास उशा सुरेश जगदाळे (रा. रांजणगाव गणपती ता. शिरूर)  या मुलीकडे नवरात्रनिमित्ताने जवळा येथे काही महिलांना सोबत फराळ घेऊन आल्या होत्या. येताना त्यांनी इसाक रहेमान तांबोळी (वय 35, रा. रांजणगाव गणपती) यांची रिक्षा केली होती. या महिला तांबोळी यांच्या रिक्षामधून आल्या होत्या.

मुलीकडे त्या फराळ देऊन परतत असताना या महिला निघोज कुंड येथे देवीच्या दर्शनासाठी काही वेळ थांबल्या होत्या. त्यावेळी रिक्षा चालक निघोज कुंड येथील कुकडी नदीच्या प्रवाहात पाय धुण्यासाठी गेला असता नदीत शेवळ असल्याने तो पाय घसरून नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये पडला. पाण्याच्या प्रवाहास वेग असल्याने तो पाण्यात वाहून गेला या वेळी तो वाहून जाताना तेथे उपस्थीत काही लोकांनी त्याला पाहिले. आरडाओरडा सुद्धा केला मात्र तोपर्यंत तो प्रवाहात थेट काळी खोल कुंडात वाहून गेला.  

स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत पारनेर पोलिस स्टेशनला माहिती दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या परिसरामध्ये तांबोळी यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान गवळी व उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी रात्री उशिरापर्यंत तांबोळी याचा शोध घेतला मात्र अद्याप तांबोळी यांचा शोध लागला नाही. खाली खोल रांजण खळगे (कुंड ) असल्याने त्या खळग्यात तो अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच पाण्याच्या प्रवाह  मोठा व जोरात वाहत असल्याने तो दूर वाहून जाण्याची शक्यातही नाकारता येत नाही.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rickshaw driver went into the water of Kukdi river in Nighoj Kund