अजबच! पारनेरच्या नगरपंचायतीत कुरनदीलाही मतदानाचा अधिकार; पत्ता, वय, लिंग वाचून बसेल धक्का

मार्तंड बुचुडे
Tuesday, 29 December 2020

नाव कुरनदी वस्ती पारनेर.. वडिलांचे नाव पारनेर पारनेर.. घर क्रमांक शून्य शून्य.. वय 50.. लिंग- पुरुष..' हे आहे, पारनेर नगरपंचायतीच्या मतदार यादीतील एका मतदाराचे नाव.

पारनेर (अहमदनगर) : नाव कुरनदी वस्ती पारनेर.. वडिलांचे नाव पारनेर पारनेर.. घर क्रमांक शून्य शून्य.. वय 50.. लिंग- पुरुष..' हे आहे, पारनेर नगरपंचायतीच्या मतदार यादीतील एका मतदाराचे नाव.

निवडणूक कर्मचाऱ्यांनी चक्क एका नदीलाच मतदार बनविले आहे. मतदार यादीत नदीचे नाव आल्याचे पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली. आता त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे पारनेरकरांचे लक्ष लागले आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पारनेर नगरपंचायत निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. शहरातील प्रभागरचना व मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ झाला आहे. पारनेर लगतच्या गावांतील मतदारांची नावे नगरपंचायतीच्या मतदार यादीत समाविष्ट केली आहेत. मतदार यादीतील अनेक नावे चुकली आहेत. सर्वात कहर, म्हणजे प्रभाग क्रमांक 14 मधील 261 क्रमांकावर चक्क एका नदीचेच नाव मतदार म्हणून नोंदविले आहे. त्यामुळे नद्यांनाही मतदानाचा अधिकार मिळाला की काय, नगरपंचायतीसाठी आता नदीही मतदान करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

तालुक्‍यातील तिखोल, पिंपरी जलसेन, कान्हूर पठार, पिंपळगाव तुर्क, भाळवणी, ढवळपुरी, लालूचा तांडा, लोणी हवेली, गांजी भोयरे येथील अनेकांची नावे मतदार यादीत आली आहेत. रहिवाशी दाखला, नगरपंचायतीचा शिक्का व नगराध्यक्षांच्या सहीनिशी ही नावे मतदार यादीत नोंदविली आहेत. त्यामुळे ही नावे कमी होणार का, असा प्रश्‍न आहे. 

लंके-औटी यांची प्रतिष्ठा पणाला 
आमदार नीलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांच्यासाठी नगरपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची आहे. लंके यांना तालुक्‍यासह पारनेर शहरावरही वर्चस्व असल्याचे या निवडणुकीतून सिद्ध करावे लागणार आहे. दुसरीकडे नगरपंचायतीवर सत्ता राखण्यासाठी औटी यांना ही निवडणूक जिंकावीच लागणार आहे. 

मतदार नोंदण्यासाठी नगरपंचायतीमार्फत देण्यात आलेले रहिवाशी दाखले मी दिलेले नाहीत. तसेच त्यावरील नगरपंचायतीचा शिक्काही बनावट असून, माझी सहीही बोगस आहे. अनेक दाखल्यांत खाडाखोड केली आहे. असे अनेक दाखले आम्ही दिलेले नाहीत. 
- वर्षा नगरे, माजी नगराध्यक्ष, पारनेर 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The river is also on the voter list in Parner election