esakal | "रयत'च्या निवडी ः उत्तर विभाग काळेंकडे, रोहित पवारांची एंट्री... "एक्‍झिक्‍युटिव्ह'वर कराळे; "मॅनेजिंग'वर राजेंद्र फाळके व बोठे
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar selected for Rayat Shikshan Sanstha

यत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत आमदार आशुतोष काळे यांचे दिवंगत आजोबा व माजी खासदार शंकरराव काळे यांचे मोठे योगदान होते.

"रयत'च्या निवडी ः उत्तर विभाग काळेंकडे, रोहित पवारांची एंट्री... "एक्‍झिक्‍युटिव्ह'वर कराळे; "मॅनेजिंग'वर राजेंद्र फाळके व बोठे

sakal_logo
By
डॉ. बाळ ज. बोठे पाटील

नगर ः रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे यांची आज निवड झाली. संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत आमदार आशुतोष काळे यांचे दिवंगत आजोबा व माजी खासदार शंकरराव काळे यांचे मोठे योगदान होते. विशेष म्हणजे, त्यांच्या पुढाकाराने नगरमध्ये राधाबाई काळे महाविद्यालय सुरू झाले.

सध्या तेथे शहरासह ग्रामीण भागातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. (कै.) काळे यांच्यानंतर आशुतोष यांचे वडील माजी आमदार अशोक काळे यांनीही संस्थेत भरीव काम केले. आमदार आशुतोष हे राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

हेही वाचा - लग्न करताय ही नियमावली वाचा

मागील तीन वर्षांपूर्वी आशुतोष यांची संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाली. काळे परिवाराचा "रयत'मधील योगदानाचा विचार करून, तसेच आमदार आशुतोष यांच्या कामाचा आवाका विचारात घेऊन त्यांच्यावर संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. 

संस्थेच्या एक्‍झिक्‍युटिव्ह कौन्सिलच्या सदस्यपदी निवड झालेले येथील राधाबाई महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे हे संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आहेत. गेली तीन वर्षे संस्थेच्या सचिवपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यांचा अनुभव व सचोटीचा संस्थेने चांगला उपयोग करून घेतला.

आता डॉ. कराळे यांना संस्थेच्या सर्वोच्च अशा एक्‍झिक्‍युटिव्ह कौन्सिल सदस्यपदी घेतले आहे. 
संस्थेत जनरल बॉडी व मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदावर दीर्घ काळ काम केलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तसेच 1995 पासून जनरल बॉडी सदस्य व गेल्या 12 वर्षांपासून समन्वय समितीचे सदस्य म्हणून काम करीत असलेले शिक्षणतज्ज्ञ विजय सावळेराम तथा बाळासाहेब बोठे यांना मॅनेजिंग कौन्सिलवर निमंत्रित सदस्य म्हणून घेतले आहे.

जाणून घ्या - मंत्री गडाख होम क्वारंटाइन, पत्नी बाधित

फाळके यांचे संस्थेच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय, तसेच कर्जत तालुक्‍यातील विविध शाळा-विद्यालयांच्या विकासात योगदान आहे. वाळकी (ता. नगर) येथील न्यू इंग्लिश स्कूल, तसेच कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व ट्यूलिप प्रायमरी स्कूल, या संस्थांच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून गेली 27 वर्षे ते जबाबदारी सांभाळत आहेत. 

जनरल बॉडी सदस्यपदी रोहित पवार व सुभाष गांधी 
संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार व आढळगाव (ता. श्रीगोंदे) येथील ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष गांधी यांची निवड झाली. पवार घराण्यातील आमदार रोहित हे तिसऱ्या पिढीतील वारस मानले जातात. धडाकेबाज कार्यशैलीसाठी आमदार रोहित नगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. गांधी यांनी संस्थेच्या आढळगाव व परिसरातील शैक्षणिक विकासात सतत पुढाकार घेतला. नागवडे सहकारी कारखान्याचे ते 10 वर्षे संचालक व आढळगावचे दीर्घ काळ सरपंच होते. 

"रयत'चा महाराष्ट्र व कर्नाटकात पसारा 
कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पुढाकाराने शिक्षणाची गंगोत्री ग्रामीण भागापर्यंत व तीही गरीबापर्यंत पोचावी, यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांसह कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात संस्थेचे कार्यक्षेत्र आहे.

या कार्यक्षेत्रात संस्थेची 43 महाविद्यालये, 156 कनिष्ठ महाविद्यालये, 438 माध्यमिक विद्यालये, असा तब्बल 759 शाखांचा मोठा शैक्षणिक पसारा आहे. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक व त्यानंतर नगर व नाशिक जिल्ह्यात संस्थेचा अधिक विस्तार आहे. संस्थेत 18 हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा (रयतसेवक) समावेश असून, तब्बल साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

संपादन - अशोक निंबाळकर