
राजकीय वाद मिटवावेत, यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा आणि गावच्या विकासासाठी आपल्या गावांना 30 लाखांचा विकासनिधी घ्या, अशी साद आमदार रोहित पवार यांनी घातली आहे.
जामखेड : विधानसभेची निवडणूक नसली तरी आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यात कर्जत-जामखेडमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
ग्रामपंचायती बिनविरोध करा, या आमदार रोहित पवार यांच्या आवाहनावर भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी टीका केली होती. त्याला आमदार पवार यांनी काल आरोळे वस्तीवर आयोजित बैठकीत उत्तर दिले. "त्यांना' विकासाचे कामे कळत नसतील, तर त्याला मी काय करू. गट-तट नसावेत, अशी आपली भावना असल्याचे पवार यांनी सांगितले.
हेही वाचा - शासनाच्या मोफत कोविड सेंटरची झाली आवराआवर
राजकीय वाद मिटवावेत, यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा आणि गावच्या विकासासाठी आपल्या गावांना 30 लाखांचा विकासनिधी घ्या, अशी साद आमदार रोहित पवार यांनी घातली आहे. त्यानंतर माजी मंत्री शिंदे यांनी टीका केली होती.
काल पवार जामखेड येथे आले होते. त्या वेळी बोलताना ते म्हणाले, की कोरोना महामारीने आपल्याला खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गावातील सर्व गट-तट बाजूला ठेऊन निवडणुकीसाठी होणाऱ्या खर्चास फाटा देत गावच्या विकासासाठी व हितासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम करायचे आहे.
आर्थिक खर्च वाचवण्याबरोबरच गावात असलेल्या राजकीय वादांना संपुष्टात आणण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा अन् गावच्या विकासासाठी आपल्या गावांना 30 लाखांचा विकासनिधी घ्या, असे म्हटले होते. कदाचित गावामध्ये गट-तट असावेत, असा त्यांचा (राम शिंदे) हेतू असावा.
गावचा विकास करताना गट-तट बाजुला ठेवून सामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेवून काम करायचं आहे. ते काय बोलतात, यापेक्षा लोकांना काय पाहिजे, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.
संपादन - अशोक निंबाळकर