esakal | साईसंस्थान विश्‍वस्तांसाठी निकष बदलणार? यादी जाहीर करण्याच्या पुन्हा हालचाली
sakal

बोलून बातमी शोधा

sai sansthan

साईसंस्थान विश्‍वस्तांसाठी निकष बदलणार? अधिसूचना जारी

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी (जि.अहमदनगर) : आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली साईसंस्थानचे विश्वस्त मंडळ निवडण्यात आले; मात्र ही यादी अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. आता यादी जाहीर करण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या. त्याचाच एक भाग म्हणून विधी व न्याय विभागाने विश्‍वस्त नियुक्तीच्या निकषात बदल करणारी अधिसूचना नुकतीच जारी केली. निकषात बसणारे विश्‍वस्त निवडण्याऐवजी निवडलेले मंडळ निकषात बसावे, यासाठी हा पर्याय निवडण्यात आला. खासदार सदाशिव लोखंडे व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी शिवसंपर्क अभियानाच्या पत्रिकेत स्वतःच्या नावापुढे ‘विश्‍वस्त’ हे नवे पद नमूद करून एका अर्थाने त्यांची निवड जाहीरदेखील केली. (Sai-Sansthan-change-criteria-for-trustees-marathi-news-jpd93)

यादी जाहीर करण्याच्या पुन्हा हालचाली

त्यामुळे नव्या मंडळाच्या संभाव्य यादीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. २०१३मध्ये विश्वस्त नियुक्तीचे नियम व निकष निश्चित करण्यात आले. आता त्यात विधी व न्याय विभागाने काही बदल केले. पूर्वी एकूण सतरापैकी आठ विश्वस्त विविध विषयांतील तज्ज्ञ किंवा जाणकार हवे होते. त्यांना त्या विषयाची पदवी व प्रत्यक्ष काम करण्याचा दहा वर्षांचा अनुभव आवश्यक होता. आता त्यात बदल करण्यात आला व पदवीबरोबरच पदविका चालेल आणि अनुभवाचा कालावधी पाच वर्षांनी कमी करण्यात आला. विश्वस्त मंडळाच्या सलग तीन बैठकांना गैरहजर राहिल्यास पद रद्द होत होते. आता ही अटदेखील मागे घेण्यात आली. या सुधारणेमुळे पूर्वी निवडलेल्या मंडळाची यादी जाहीर करण्यास सरकारला अडचण राहिली नाही, असे महाविकास आघाडीच्या वर्तुळातून सांगण्यात आले.

काही जणांकडून नावापुढे पदही नमूद

आमदार काळे यांची संस्थानच्या अध्यक्षपदासाठी निवड निश्चित आहे. संभाव्य यादीत उपाध्यक्षपदी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांचे नाव आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून राहुरीचे सुरेश वाबळे, पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक, नाशिक येथील बांधकाम व्यावसायिक माजी आमदार जयंत जाधव (नाशिक), शिर्डीतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी महेंद्र शेळके यांची नावे आहेत. शिवसेनेच्या संभाव्य यादीत युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनल, खासदार सदाशिव लोखंडे, नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व अॅड. संगीता चव्हाण यांची नावे आहेत. काँग्रेसच्या संभाव्य यादीत कोपरगावचे बांधकाम व्यावसायिक संग्राम देशमुख, संगमनेरचे नामदेव गुंजाळ व श्रीरामपूरचे सचिन गुजर, ही तीन नावे सांगितली जातात. नांदेड येथील माजी आमदार डी. पी. सावंत, तसेच विदर्भातील समजू न शकलेले आणखी एक नाव, अशी संभाव्य यादी आहे. याशिवाय शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर हे पदसिद्ध विश्वस्त असतील.

हेही वाचा: ‘विकेंड’मुळे शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक बदलणार?

विधी व न्याय विभागाने २०१३ मध्ये विश्वस्त मंडळ नियुक्तीची नियमावली जाहीर केली. त्याविरोधात आम्ही २०१५मध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. आता नव्या दुरुस्तीसदेखील आम्ही आक्षेप घेणार आहोत. - संजय काळे व संदीप कुलकर्णी, माहिती अधिकार कार्यकर्ते

हेही वाचा: लस न घेताच ऑनलाइन प्रमाणपत्र; लसीकरणाचा सावळा गोंधळ उघडकीस

loading image