हद्दीचा फायदा घेत शिरूर-पुण्यातील तस्करांकडून नगरमध्ये वाळूउपसा

संजय आ. काटे
Thursday, 19 November 2020

कर्जत-श्रीगोंदे उपविभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी बेलवंडी हद्दीत वाळूविरोधात गेल्या महिन्यात कारवाई केली.

श्रीगोंदे : शिरूरच्या हद्दीवर असलेल्या घोड नदीपात्रातून वाळूचोरी सर्रास सुरू असते. गेल्या महिन्यात वाळूचोरीला खुलेआम सूट देणाऱ्या बेलवंडी पोलिसांनी आता कारवाईचे शस्त्र उगारले आहे. नव्याने आलेले उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी पहिली कारवाई केल्यानंतर आता बेलवंडी पोलिसांनीही या महिन्यात दोन कारवाया केल्या.

तहसीलदार प्रदीप पवार मात्र कारवाईसाठी कधी बाहेर पडणार, याची उत्सुकता आहे. घोड नदीपात्रातील म्हसे, माठ, राजापूर, हिंगणी, दाणेवाडी या भागात मोठी वाळूचोरी सुरू असते. मध्यंतरी म्हसे, माठ, राजापूर या भागातील नदीपात्रात खुलेआम बोटीतून वाळूउपसा सुरू होता. त्या वेळी बेलवंडी पोलिसांकडे अनेक वेळा तक्रारी झाल्या; मात्र ठोस कारवाई झाली नाही.

तत्कालीन उपअधीक्षक संजय सातव यांनी एक कारवाई केली. त्यानंतर शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी सरहद्द ओलांडून केलेली धडाकेबाज कारवाई चर्चेत आली. 

कर्जत-श्रीगोंदे उपविभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी बेलवंडी हद्दीत वाळूविरोधात गेल्या महिन्यात कारवाई केली. त्या वेळी स्थानिक पोलिसांना सक्त सूचना दिल्याने, आता बेलवंडी पोलिसही वाळूचोरांविरोधात कारवाईसाठी सरसावले आहेत.

गेल्या आठवड्यात पोलिसांनी बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त करताना बोटींच्या चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या पथकाने बुधवारी राजापूर-कोल्हेवाडी शिवारात वाळूचोरांविरुद्ध कारवाई केली. नव्याने आलेले तहसीलदार पवार मात्र वाळूचोरीविरोधात अजूनही आक्रमक दिसत नाहीत. 
 

वरिष्ठांच्या सूचनांवरून वाळूचोरांविरुद्ध मोहीम राबवीत आहोत. यापुढे बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाळूचोरी होऊ न देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या असून, वाळूचोरी करणाऱ्या बोटी व यंत्रांच्या मालकांविरुद्ध थेट गुन्हे दाखल होतील. 
- अरविंद माने, पोलिस निरीक्षक, बेलवंडी 
 
वाळूचोरीविरोधात अजून मोहीम सुरू केली नाही. मात्र, लवकरच वाळूसह गौण खनिजचोरांविरुद्ध कायमस्वरूपी कारवाई हाती घेणार आहोत. 
- प्रदीप पवार, तहसीलदार , श्रीगोंदा, अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sand extraction in the city from smugglers in Shirur-Pune