वाळू चोरांवर कारवाई करण्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे तहसीलदारांना निर्देश

विलास कुलकर्णी
Monday, 7 December 2020

राहुरी शहरातून देसवंडी व तमनर आखाडा येथे मुळा नदीपात्रातून असलेला जवळचा रस्ता वाळूतस्करांनी उध्वस्त केला.

राहुरी (अहमदनगर) : राहुरी शहरातून देसवंडी व तमनर आखाडा येथे मुळा नदीपात्रातून असलेला जवळचा रस्ता वाळूतस्करांनी उध्वस्त केला. नदीपात्रातील वाळू चोरी करतांना रस्त्यावर मोठे खड्डे तयार केले. त्यामुळे, ग्रामस्थांची गैरसोय निर्माण झाली. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. 

हेही वाचा : बायको अन्‌ मी शेतात गवत काढत होतो, मागे बघतोय तर, बिबट्याचा प्रत्यक्षदर्शीचा थक्क करणारा अनुभव
रस्ता दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. देसवंडीचे सरपंच गणेश खेवरे, अरुण कल्हापुरे, दिलीप कल्हापुरे, प्रवीण शिरसाट, सुभाष पवार, प्रकाश शिरसाट, तमनर आखाडाचे उपसरपंच आप्पासाहेब तमनर, दिलीप तमनर, किशोर तमनर यांच्या शिष्टमंडळाने मंत्री तनपुरे यांची भेट घेतली. तिळेश्वर मंदिर ते गणपती घाट दरम्यान नदीपात्रात वाळू तस्करांनी मोठे खड्डे केले आहेत. 

देसवंडी येथे जाण्यासाठी केलेला कच्चा रस्ता वाळूतस्करांनी उखडून टाकला. त्यामुळे, देसवंडी व तमनर आखाडा येथील शाळेसाठी राहुरीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची, दूध उत्पादक शेतकरी व नागरिकांची गैरसोय निर्माण झाली आहे. नदीपात्रातील रस्ता दुरुस्ती करावा. भविष्यात पूल बांधावा, अशी मागणी केली. 

त्यावर, मंत्री तनपुरे यांनी मुळा नदीपात्रातील रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. तहसीलदार फसियोद्दीन शेख, उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, दशरथ पोपळघट, नंदकुमार तनपुरे, विलास तनपुरे, बाळासाहेब उंडे, अशोक आहेर, धीरज पानसंबळ, दिलीप कल्हापुरे, सागर कल्हापुरे, शंकर तमनर, लाला तमनर, किशोर जाधव, बाबासाहेब येवले उपस्थित होते. पाहणीनंतर मंत्री तनपुरे यांनी वाळू तस्करांवर कारवाईचे निर्देश देऊन, रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sand extraction from radish river basin in Deswandi and Tamnar akhada