संगमनेर : रक्षाबंधनाच्या दिवशीच युवतीची छेडछाड; महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangamner

संगमनेर : रक्षाबंधनाच्या दिवशीच युवतीची छेडछाड; महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली

संगमनेर : संगमनेरकरांच्या आवडीचे ठिकाण असलेला प्रवरेकाठचा गंगामाई घाट तेथील व्यसनी युवकांच्या वर्दळीमुळे फिरण्यासाठी जाणाऱ्या महिला व युवतींसाठी धोकादायक बनला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रसन्न वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एका युवतीचा हात धरुन तिची छेड काढल्याच्या घटनेने संताप व्यक्त होत आहे. या बाबत अधिक माहिती अशी, रविवार रोजी सायंकाळी चारच्या सुमारास नेहमीप्रमाणे गंगामाई घाट परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका युवतीला अमली पदार्थांच्या सेवनाने धुत्त झालेल्या दोघांनी हेरले. (Pune News)

त्यापैकी एका युवकाने तिच्या दिशेने आगेकुच केली. घटनेचे गांभीर्य व अघटीताची चाहूल लागल्याने तिने त्याला खडसावले, पोलीसांना फोन करण्याची धमकी दिली मात्र, त्याला न जुमानता त्याने तिच्या हाताला धरुन तिला ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा दुसरा साथीदार त्याला प्रोत्साहन देत होता. या घटनेने घाबरलेल्या त्या युवतीने प्रसंगावधान राखून मदतीसाठी आरडाओरडा केल्याने, केशवतिर्थ मंदिराजवळ बसलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने मदतीसाठी धाव घेतली. त्यामुळे ते दोघेही दुचाकीवरुन पसार झाले. तिने प्रथम संगमनेर शहर पोलीस ठाणे आणि नंतर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना फोनवरुन झालेला प्रकार सांगितल्यानंतर पोलीसांनी तो परिसर पिंजून काढला. मात्र संशयित आढळले नाहीत. या प्रकरणी सहभागी असलेल्यांची नावे पोलीसांना खबऱ्यामार्फत मिळाली आहेत.

हेही वाचा: सरकारने कितीही रोखले तरी दहीहंडी उत्सव साजरा करणार - राम कदम

प्रवरेकाठच्या या परिसरातील अनेक मंदिरे, दशक्रियाविधी घाट यामुळे या परिसरात धार्मिक नागरिक व महिलांची कायम वर्दळ असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा परिसर अंमली पदार्थांसह मद्यसेवन करणाऱ्या टारगट युवकांच्या टोळ्या तसेच स्थानिक अवैध वाळू तस्करांचा अड्डा बनला आहे. कालच्या घटनेने या परिसरात होवू शकणाऱ्या संभाव्य घटनांची नांदी दिल्याने, या परिसरात बीट मार्शलची गस्त वाढवून सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी होत आहे.

loading image
go to top