esakal | खासदार राहुल गांधींना दिलेला धक्का म्हणजे त्यांना नाही तर तो लोकशाहीला होता
sakal

बोलून बातमी शोधा

Sangamner taluka RPI Protest against the incident in Uttar Pradesh

जंगलराज असलेल्या उत्तर प्रदेशातच नाही तर महाराष्ट्र आणि नगर जिल्ह्यातही माणूसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत.

खासदार राहुल गांधींना दिलेला धक्का म्हणजे त्यांना नाही तर तो लोकशाहीला होता

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : जंगलराज असलेल्या उत्तर प्रदेशातच नाही तर महाराष्ट्र आणि नगर जिल्ह्यातही माणूसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत.

हाथरस येथील दलित कन्येवर झालेला अत्याचार व तिची हत्या योगी सरकारची मानसिकता स्पष्ट करते आहे. या अन्यायाविरोधात भारतीय म्हणून तरी रस्त्यावर या अन्यथा, अशा असंख्य निर्भया वासनांधांच्या शिकार होत राहतील, अशा कठोर शब्दात काजल निळे या युवतीने तिचे विचार प्रकट केले.

आज उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेचा संगमनेरातील सर्व दलित समाजाच्या वतीने मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला. तसेच संगमनेर बसस्थानकासमोर काही वेळ रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा : देशांत सर्वाधिक चांगली कायदा व सुव्यवस्था ही महाराष्ट्रातच
त्या म्हणाली, आज देशात कायदा व सुव्यवस्थेचा बाजवार उडाला आहे. महिला व मुली सुरक्षित नसल्याची बाब प्रकर्षाने अधोरेखित होत आहे. कायदा आपले काहीच बिघडवू शकत नाही याची खात्री असल्याने, नराधमांची हिंमत वाढली आहे. दलितांवर अत्याचार करणे हा जन्मसिध्द हक्क असल्याची वृत्ती समाजात फोफावत आहे. या घटनेत उत्तर प्रदेशातील पोलिस व न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी तातडीने उपचार व आरोपींवर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही.

आठ दिवसांनंतर तिची तपासणी करुन अत्याचार झालाच नसल्याचा निष्कर्ष जाहीर करणारी यंत्रणा किती निर्लज्ज असेल याची विचारही करवत नाही. महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या घटनांचे भांडवल करणारे तथाकथीत पत्रकार, नेते व अभिनेत्रीच्या तोंडाला कुलूप का लागले आहे असा सवाल तिने केला. देश हुकूमशाहीच्या दिशेने जात असून, खासदार राहुल गांधींना दिलेला धक्का त्यांना नाही तर लोकशाहीला दिला होता, अशी बोचरी टीका निळे हिने केली.
 

या वेळी रिपाईचे आठवले व गवई गट, दलित पँथर, मातंग आघाडी, वाल्मिकी संघटना व गणराज्य संघटनेसह छात्रभारती व मराठा संघटनांचे प्रतिनिधी मोर्चासाठी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बसस्थानक या दरम्यान फेरी काढून बसस्थानकावर निषेधसभा घेण्यात आली. यावेळी रिपाईचे राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष अशोक खरात, तालुकाध्यक्ष आशिष शेळके, कैलास कासार, मंजाबापू साळवे, राजू खरात, सुधाकर रोहम, किशोर चव्हाण आदींसह शरद थोरात, अनिकेत घुले, नामदेव घुले आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी निवेदन स्वीकारले.
 

उत्तर प्रदेशातील या निर्घृण घटनेत आरोपींना पाठीशी घालणारे पोलिस व सनदी अधिकाऱ्यांना सहआरोपी करुन सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात येत आहे.
- श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष व नगर जिल्हा संपर्क प्रमुख, रिपाई आठवले गट

संपादन : अशोक मुरुमकर