प्रशासक येण्यापूर्वी श्रीगोंद्यात बिलं काढण्यासाठी सरपंच-ठेकेदारांची धावपळ

संजय आ. काटे
Sunday, 6 September 2020

चौदाव्या वित्त आयोगातील अनेक पेडींग कामे मुदत संपण्यापुर्वी मार्गी लावण्यासाठी टेंडर फ्लॅश करण्याची घाई सुरु आहे. अनेक ठिकाणी तसे झालेही आहे. काम कधी पण सुरु होवो मात्र आपल्या कार्यकाळात निविदा निघावी आणि त्यासाठी ती निविदा मॅनेज करुन मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी धडपड असल्याचे बोलले जाते

श्रीगोंदे : या महिन्यात 53 ग्रामपंचायतींच्या सत्ताधाऱ्यांची मुदत संपत असल्याने प्रशासक नेमले जाणार आहे. मात्र, त्यापुर्वीच प्रलंबित कामांचा निपटारा करतानाच केलेल्या अर्धवट कामांची बिले काढण्याच्या कामांना भलताच वेग आला आहे.

सरपंच आणि ठेकेदार ग्रामसेवकांना हाताशी धरुन ही कामे करुन घेत असल्याची गावातील स्थिती आहे. घाईने होणाऱ्या या कागदी कामात मोठी अनिमियतता राहण्याची भिती असून वरिष्ठांनी त्याकडे कानाडोळा केला तर घोटाळाही होवू शकतो. 

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून कार्यकर्त्यांची वर्णी लागणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने सत्ताधाऱ्यांची धावपळ उडाली आहे. आता प्रशासक म्हणून अधिकारी वा कर्मचारी येणार असल्याने त्यांच्या हाती पेंडींग कामांचा निपटारा जावू न देण्यासाठी बहुतेक सर्वच ग्रामपंचायतींची गडबड सुरु झाली आहे. कोरोनाच्या काळात पेंडींग फाईल, अथवा निविदा तातडीने मार्गी लावण्यासाठी सरपंच, ठेकेदारासोबतच ग्रामसेवक आघाडीवर आहेत. 

समजलेल्या माहितीनुसार, चौदाव्या वित्त आयोगातील अनेक पेडींग कामे मुदत संपण्यापुर्वी मार्गी लावण्यासाठी टेंडर फ्लॅश करण्याची घाई सुरु आहे. अनेक ठिकाणी तसे झालेही आहे. काम कधी पण सुरु होवो मात्र आपल्या कार्यकाळात निविदा निघावी आणि त्यासाठी ती निविदा मॅनेज करुन मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी धडपड असल्याचे बोलले जाते. यात मोठी अनिमियतता असल्याची तक्रारी आहेत.

दरम्यान जी कामे प्रलंबित आहेत अथवा बिले राहिली आहेत, ते काढण्यासाठीही घाई सुरु असून सदर कामांचा दर्जावर मुदत संपण्यापुर्वीच झाकण टाकण्यासाठी सत्ताधारी मंडळी सरसावली आहेत. 

हेही वाचा - दक्षिण काशीत दहावे, तेरावे अॉनलाईन, कावळा येतो क्लिकवर

ग्रामपंचायतीचे अनेक निविदा मॅनेज होत असल्याचे सत्य आता पडद्याआड राहिलेले नाही. अनेक गावात ठराविक कार्यकर्तेच ठेकेदार असून प्रत्येक ऑनलाईन निविदा त्यांनाच कशी मिळते, हा संशोधनाचा भाग आहे. त्यातच या निविदा मॅनेज करताना एखाद्या ठेकेदाराची शेवटच्या टप्यात निविदा अधिकाऱ्यांची स्थळ पाहणी अहवाल न आल्याची कारणे दाखवून रद्द करण्याची खेळी खेळली जाते. एकाच पध्दतीच्या कामांच्या अटी व शर्तींमध्ये काही गावांच्या निविदेत फरक असल्याने ही मॅनेज सिस्टिम नेमकी कुठून राबवली जाते, याची चौकशी करण्याचे धाडस अधिकारीही करीत नाहीत. शिवाय आदर्श निविदा प्रक्रिया कशी असावी, याचे मार्गदर्शनही जिल्हा परिषदेतून होत नसल्याने गोंधळ वाढत आहे. 

चुकीच्या पध्दतीने कुणीही निविदा काढण्याचा अथवा बीले काढण्याचा प्रयत्न करु नये असे बजाविण्यात आले आहे. याविषयी कुणाच्या तक्रारी आल्यास तातडीने चौकशी करु. 
- प्रशांत काळे, गटविकास अधिकारी पंचायत समिती श्रीगोंदे. 
 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarpanch fielding at Shrigonda to approve bills