esakal | बांधकाम विभागाच्या नाकावर टिचून सरपंचांनी बुजवले राज्यमार्गावरील खड्डे
sakal

बोलून बातमी शोधा

Sarpanch of Vadule Budruk Pradip Kale repaired the road

सहा महिन्यापासून वाहन चालकांची परिक्षा पाहणाऱ्या शेवगाव पांढरीपूल राज्यमार्गावरील खड्डयांना बुजवण्यासाठी अखेर वडुले बुद्रुकचे सरपंच प्रदिप काळे धावून आले.

बांधकाम विभागाच्या नाकावर टिचून सरपंचांनी बुजवले राज्यमार्गावरील खड्डे

sakal_logo
By
राजू घुगरे

अमरापूर (अहमदनगर) : सहा महिन्यापासून वाहन चालकांची परिक्षा पाहणाऱ्या शेवगाव पांढरीपूल राज्यमार्गावरील खड्डयांना बुजवण्यासाठी अखेर वडुले बुद्रुकचे सरपंच प्रदिप काळे धावून आले. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकावर टिचून वडुले बुद्रुक गावाजवळील खड्डे स्वखर्चाने मुरुम टाकून बुजवले. त्यामुळे वैतागलेल्या वाहन चालकांना काही अंशी दिलासा मिळाला. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जुन पासून झालेल्या पावसामुळे तालुक्यातील सर्वच रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यावरील मोठमोठया खड्डयांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डयांचा व त्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अनेकदा जीव घेणे अपघातही घडले आहेत. शेवगाव पांढरीपूल राज्यमार्ग वडुले ब्रुद्रुक, सिध्दी विनायक गणेश मंदीर, मळेगाव येथील फरशीपुल, निकम वस्ती, आपेगाव नजीक पेट्रोल पंपासमोर, ढोरजळगाव येथील नाकाडे वस्ती, निंबेनांदुर या परिसरात प्रचंड फुटला आहे. रस्त्याची अर्धा एक किलोमीटर अंतरापर्यंत पुर्णपणे चाळण झालेली आहे. त्यातच कारखान्यांचा हंगाम सुरु झाल्याने ट्रक्टर व टायर गाडयांची वर्दळ सुरु झाली आहे. पावसाळा थांबून महिनाभराचा कालावधी उलटला तरी सार्वजनिक बांधकाम विभागास रस्त्याची ही दुरावस्था खड्डे बुजून दुरुस्त करण्यास मुहूर्त लागलेला नाही. 

सध्या दिवाळी नंतर रस्त्यावरील वाहतुक मोठया प्रमाणावर वाढली असून खड्डयांमुळे अशरक्ष: जीव धोक्यात घालून वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वडुले बुद्रुक येथील बसस्थानकाजवळील खड्डयामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून त्यामुळे अनेक जण जायबंदी झाले आहेत. वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागास सांगुनही खड्डे बुजवले जात नसल्याने सरपंच प्रदिप काळे यांनी स्वखर्चाने पाच फुटापेक्षा मोठया आकाराच्या खड्डे मुरमाने भरुन जेसीबीच्या सहयाने भरुन काढले. त्यासाठी त्यांना जमीर शेख, मंगेश पाखरे, शरद पवार, सुहास गर्जे, औदुंबर आरे, ज्ञानेश्वर जगताप, प्रविण हरदास आदींनी त्यांना सहकार्य केले.

संपादन : अशोक मुरुमकर