कोरोनाला दूर सारत सावित्रीचे स्मरण; अकोले तालुक्यात शाळा, महाविद्यालयात विविध कार्यक्रम

शांताराम काळे
Sunday, 3 January 2021

शाळा, महाविद्यालय, आदिवासी विकास, बालवाडी विकास प्रकल्प व अंगणवाडीमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती शिक्षक दीन म्हणून साजरी करण्यात आली. 

अकोले (अहमदनगर) : तालुक्यात सावित्रीबाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अकोले, राजूर, समशेरपूर, शेंडी, भंडारदरा, मवेशी, कोतुळ या ठिकाणी शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, आदिवासी विकास, बालवाडी विकास प्रकल्प व अंगणवाडीमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती शिक्षक दीन म्हणून साजरी करण्यात आली. 

यावेळी महिला शिक्षिका, सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. राजूर येथील अंगणवाडी प्रकल्पात व श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची माहिती देण्यात आली. मुलींनी गीते व नाटिका सादर केला. कोरोना संकट असतानाही त्याला दूर सारत महिलांना मुलींना शिक्षणाचे कवाडे उघडून देणाऱ्या सावित्री मातेचे स्मरण केले. 

सावित्रीच्या लेकी आम्ही मागे आता राहणार नाही म्हणत जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. प्राचार्या मंजुषा काळे यांनी सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीकाच नव्हें तर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील आहेत. या व्यतिरीक्त त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हंटल्या जातं. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता खर्ची घातले. 

अंगणवाडी प्रकल्पाच्या जयश्री देशमुख यांनी महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतांना सावित्रीबाईंना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले. परंतु त्यांनी हार मानली नाही. धैर्य खचु न देता संपुर्ण आत्मविश्वासाने संघर्षाला सामोरे गेल्या. यावेळी मुलींनी आपले विचार मांडले सुत्रसंचलन सुनीता पापळ तर आभार अंगणवाडी सेविका नंदा देशमुख यांनी मानले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai Phule Jayanti celebration in Akole taluka