"धांदरफळ'ला दिलासा; सात जणांची कोरोनावर मात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मे 2020

कोरोना विषाणूला लगाम लावण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 64 असून, त्यापैकी आता दहा जणांवर उपचार सुरू आहेत.

नगर ः संगमनेर तालुक्‍यातील धांदरफळ येथील सात जणांना आजाराची कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याने केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य तपासणी करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे हादरलेल्या धांदरफळ बुद्रुक गावाला आज दिलासा मिळाला. जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या आता 49 झाली आहे. 

धांदरफळ येथील रुग्णांवर बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मागील दहा दिवसांत त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. त्यांना पुढील दहा दिवस संगमनेर येथे संस्थात्मक विलगीकरणामध्ये देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वागत करून त्यांना आज निरोप दिला. 

हेही वाचा ः टोमॅटोवर "तिरंगा' आणि शेतकरी हवालदिल 

कोरोना विषाणूला लगाम लावण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 64 असून, त्यापैकी आता दहा जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून आज प्राप्त झालेल्या नऊ अहवालांपैकी पाच निगेटिव्ह आले आहेत, तर चार अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. 

अवश्‍य वाचा ः राशीनमध्ये जुगाराच्या छाप्याऐवजी तोडण्याची भाषा 

""जिल्ह्यातील नागरिकांनीही कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सकारात्मक प्रयत्नांना प्रतिसाद दिला. मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका संपला नाही. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. घराबाहेर पडताना चेहऱ्यास मास्क बांधावा. आवश्‍यकता असेल, तरच घराबाहेर पडावे. घरातील वृद्ध, आजारी व लहान मुलांची काळजी घ्यावी,'' असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. 

कोरोना मीटर 
1847 व्यक्तींची तपासणी 
64 पॉझिटिव्ह 
1735 निगेटिव्ह 
34 निरीक्षणाखाली 
762 होम क्वारंटाईन 
04 अहवाल येणे बाकी 
49 रुग्णांना डिस्चार्ज 
05 जणांचा मृत्यू 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven people beat Corona