शंकरराव गडाखांमुळे शिवसेनेत इन्कमिंग वाढेल, संपर्कमंत्री भाऊ कोरगावकर यांना आशा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 September 2020

साहजिकच शिवसेनेसाठी नगर जिल्हा म्हणजे "सुपीक जमीन' आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व नगरचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी केले. 

नगर ः नगर शहरासह जिल्ह्यातील विविध समाजघटकांतील लोक शिवसेनेवर प्रेम करतात. त्यामुळेच जिल्ह्यात शिवसेनेला सतत प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे "बाळासाहेबांची शिवसेना' असा लौकिक असलेल्या शिवसेनेने अनेकांच्या हृदयात स्थान मिळविले. त्याचा दृश्‍य परिणामही वेळोवेळी दिसून आला.

साहजिकच शिवसेनेसाठी नगर जिल्हा म्हणजे "सुपीक जमीन' आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व नगरचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी केले. 

राजकारणाबरोबरच शिक्षण, कला व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असलेल्या कोरगावकर यांनी आज येथील "सकाळ' कार्यालयास भेट देऊन संपादकीय "टीम'शी संवाद साधला.

हेही वाचा - लांब उडी घेण्यासाठी शिवसेनेचा वाघ मागे सरकला

"सकाळ'चे कार्यकारी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांनी सकाळ प्रकाशनाचे "बाळ'बोध हे पुस्तक देवून कोरगावकर यांचे स्वागत केले. कोरगावकर यांनी शिवसेनेसंदर्भात नगर शहर व जिल्ह्यातील स्थिती विशद केली. याशिवाय शिक्षणासह कौशल्यविकास, कला, पर्यावरण, उद्योग यांसह इतर बाबींसंदर्भात परखड भाष्य केले. 

""ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे राजकारण, सहकार, समाजकारण, साहित्य, कला यांसह विविध क्षेत्रात मोठे योगदान आहे. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख या दोघा बंधूंनी यशवंतरावांचा वारसा समर्थपणे पुढे चालविला आहे. त्यातच शंकरराव गडाख यांनी सेनेत प्रवेश केला.

शंकररावांचे नेतृत्व संयमी व दूरदर्शी आहे. गडाखांची प्रतिमा चांगली असून, त्यांचे धोरण सर्वसमावेशक आहे. त्यामुळे आता शिवसेनेत येण्यासाठी विविध पक्ष व संघटनांमधील मंडळी इच्छुक आहेत. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या धाडसी नेतृत्वाकडे तरुण पिढीबरोबरच विविध वयोगटातील मंडळी आकर्षित होत आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात शिवसेनेची घोडदौड जोरात सुरू झाली आहे. त्यातून पक्ष अधिक मजबूत होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते,'' असे कोरगावकर यांनी स्पष्ट केले. 

नगर शहरात गेली 25 वर्षी शिवसेनेचा एकछत्री अंमल होता. अनिलभैया राठोड नावाचं वादळ सतत घोंगावत होतं; परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत भैया पराभूत झाले. गेली 40 वर्षे नगरमध्ये अनिलभैया व शिवसेना हे परवलीचे शब्द होते; परंतु काही दिवसांपूर्वीच भैयांची अकाली एक्‍झिट झाली. त्यांच्या जाण्याने शिवसेनेचा पहाड रातोरात गायब झाला. शिवसैनिकांचा आधावड हरपला.

भैयांच्या जाण्याने नगर शहर शिवसेनेत पोकळी निर्माण झाली. भैयांच्या या योगदानाची दखल घेत शिवसेनेची घोडदौड सुरूच राहील. नगरची सेना पुन्हा त्याच तेजाने व जोमाने सुरू होईल. पक्षातील कथित मळभही दूर होईल, असा विश्‍वास कोरगावकर यांनी व्यक्त केला. 

नगरच्या महापालिका स्थायी समितीच्या सभापती निवडीत भाजपचे मनोज कोतकर एका दिवसात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आले. त्याच दिवशी त्यांना राष्ट्रवादीने सभापतिपदाची उमेदवारी दिली. परिणामी, शिवसेनेचे योगीराज गाडे हेही रिंगणात राहिले. ही निवडणूक अटीतटीची होणार, असे चित्र रंगविले जात असतानाच या निवडणुकीतून शिवसेनेने ऐनवेळी माघार घेतली. 

या बाबत छेडले असता, कोरगावकर म्हणाले, ""मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या पुढाकाराने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले.

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळण्याचा आदेश झाला. त्यामुळे शिवसेनेने माघार घेतली. तसेही वेगळे चित्र निर्माण करण्याची नगरची परंपरा आहे. भाजपमधील नगरसेवक एका रात्रीत राष्ट्रवादीत आला व दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या पाठिंब्यावर स्थायी समितीचा सभापती झाला, हे त्याचेच द्योतक आहे.'' 

आगामी निवडणुकांमध्ये चित्र वेगळे असेल! 
शिवसेना हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे भांड्याला भांडे लागणारच. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व पदाधिकारी व मंत्री गडाख यांच्या समन्वयातून शिवसेनेचे तालुका पातळीवरील पक्षांतर्गत वाद व हेवेदावे संपुष्टात आणण्याचे काम सुरू आहे. त्याला पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका व त्यानंतरच्या लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीत चित्र वेगळे असेल. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा वरचष्मा असेल, यात काडीमात्रही शंका नाही, असा विश्‍वास कोरगावकर यांनी व्यक्त केला. 

पारनेरमध्ये उद्धव ठाकरे ठरवतील तोच आमदार! 
पारनेरमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार विजय औटी पराभूत झाले. निवडून आलेले आमदार हेही शिवसेनेच्याच मुशीत तयार झालेले आहेत. पारनेर तालुका ही सेनेच्या मतदारांची खाण आहे. जनता शिवसेनेबरोबर असल्याने आता पारनेरची सेना पुन्हा नव्या जोमाने मूळ धरू लागली आहे. लवकरच पारनेरला शिवसेनेचे चांगले कार्यालय असेल. नगरलाही चांगले कार्यालय होईल. पारनेरमधील शिवसेनेची ताकद विचारात घेता, आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे ठरवतील, तोच पारनेरचा आमदार होईल, असा दावा कोरगावरकर यांनी केला. श्रीगोंद्यासह इतर तालुक्‍यांतही शिवसेनेचा विस्तार अधिक गतीने करण्यावर आमचा भर आहे, असेही ते म्हणाले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shankarrao Gadakhan will increase incoming in Shiv Sena