पवारांनी दिल्लीतील ती बातमी छापू दिली नाही, पण आज तर मुद्दाम छापा!

आनंद गायकवाड
Saturday, 12 December 2020

दिल्लीत आंदोलनासाठी गेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची बसच गायब झाली होती. याला त्याला फोन करून काही उपयोग झाला नाही. शेवटी सर्वांनाच पवार साहेब आठवले.

संगमनेर ः शरद पवार हे कोणा एका पक्षाचे असले तरी ते सर्वांसाठी खुले आहेत. मदतीबाबत त्यांनी कधीच पक्षपात केला नाही. असाच एक अनुभव महिला संघटनेच्या नेत्या, अंगणवाडी कर्मचारी सभेच्या प्रदेशाध्यक्ष, अॅड. निशा शिवूरकर यांनी सांगितला.

त्याचे असे झाले ः अंगणवाडी कर्मचारी दिल्लीत मोर्चासाठी गेल्या होत्या. मोर्चानंतर महिलांची बस हरवली. त्यांच्या शोधासाठी एकच गहजब उडाला. 

सन 1993 किंवा 1994 सालातील ही घटना आहे. संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन शरद पवारांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारला होता. या दरम्यान दिल्लीमध्ये अॅड. निशा शिवूरकर यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचारी संघटनेने काढलेल्या मोर्चात महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

मोर्चा पार पडल्यावर काही महिलांनी एवढ्या लांब पैसे खर्च करून आलोय तर दिल्ली पहावी या भावनेतून हिंडण्यासाठी एक बस ठरवली. मात्र, काळजी वाढवणारी घटना घडली. संध्याकाळी एकच बस परत आली. मात्र, एक बस रात्र झाली तरी परतली नव्हती. त्यामुळे सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. नको नको ते विचार मनात यायला लागले.

त्या काळात मोबाईल फोन नसल्याने नक्की काय घडले, हे समजणे अवघड असल्याने शिवूरकर हैराण झाल्या होत्या. दिल्लीत कोणाला भेटायचे, या महिलांचा छडा कसा लावायचा काहीच सुचत नव्हते. त्यांनी दिल्लीत एका वृत्तपत्राचा प्रतिनिधी असलेल्या नितीन वैद्य यांना फोन केला.

रात्रीचे दहा वाजले होते. त्यांनाही या परिस्थीतीचे गांभीर्य समजले. त्यांनी ताबडतोब केंद्रीय मंत्रिमंडळातील मराठी मंत्र्याला फोन लावला. साहेब झोपले आहेत, डिस्टर्ब करू नका असे उत्तर मिळाले. या वेळी नितीन वैद्य यांना शरद पवार काही कामानिमित्त दिल्लीला आल्याचे आठवले. रात्री अकराच्या सुमारास त्यांनी तातडीने महाराष्ट्र सदनात फोन केला.

शरद पवारांनी फोन घेतला, सर्व हकीकत ऐकली, काळजी करू नकोस असे सांगितले. दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजता शरद पवार स्वतः पहाडगंज पोलिस ठाण्यात पोचले. माजी संरक्षणमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पोलिस ठाण्यात आल्याने तेथील अधिकारी व कर्मचारी हडबडून गेले. ताबडतोब सूत्र हलली. सकाळी सात वाजता शरद पवारांचा फोन आला.

हेही वाचा - नगरचे कलेक्टर राहतात महालात

मी पहाडगंज पोलिस ठाण्यातून बोलतोय, महिलांची बस हरिद्वारला आहे. दिल्ली पाहिल्यावर हरिद्वारला जाण्याचे त्यांनी ठरवले. ती बस आज पोचेल दिल्लीत, निशाताईंना सांगा काळजी करू नका. आणि आणखी एक, ही बातमी छापू नका, अंगणवाडी कर्मचारी महिला आहेत, त्यांनी हट्टाने बस हरिद्वारला नेली हे त्यांच्या गावात कळले तर गहजब होईल. मदत केल्यानंतरही पवार साहेबांनी एवढी काळजी घेतली होती. 

वैद्य यांनी ताबडतोब ही माहिती निशा शिवुरकर यांना कळवली. या नेत्याची जिंदादिली शिवूरकर यांच्यासह राज्यातील अंगणवाडी कर्मचारी महिलांनी अनुभवली. आता या घटनेला मोठा काळ लोटला असल्याने आता बातमी देण्यास हरकत नाही. शिवाय आज त्यांचा वाढदिवस आहे, असे शिवूरकर यांनी "सकाळ"शी बोलताना स्पष्ट केले.

संपादन - अशोक निंबाळकर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar said, don't print news in Delhi