शेवगावात सरकारविरोधी झाली घोषणाबाजी

सचिन सातपुते
Saturday, 1 August 2020

आखेगाव रस्त्यावरील स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्यासमोर दुध ओतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.

शेवगाव : दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर दहा रुपये अनुदान देऊन तीस रुपये भाव देण्यात यावा, भुकटीसाठी खर्चाच्या पन्नास टक्के अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांना मुबलक खत उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शेवगाव येथे भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

आखेगाव रस्त्यावरील स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्यासमोर दुध ओतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे,सरचिटणीस भिमराज सागडे, शहराध्यक्ष रवि सुरवसे, महिला तालुकाध्यक्षा आशा गरड, शहराध्यक्षा उषा कंगणकर, बापूसाहेब पाटेकर, दिनेश लव्हाट, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - हे सरकार म्हणजे एकाच नवऱ्याच्या दोन बायका

राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे यावेळी कार्यकर्त्यांकडून दहन करण्यात आले.कोरोनाचा राज्यभर कहर चालू असताना महाराष्ट्र सरकारकडून मात्र शेतकऱ्यांना लागणारे युरिया खत मिळत नाही, वीजेसाठी अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, दुधाला भाव नसल्याने शेतकऱ्यांना जनावरे कशी जगवावीत असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकीकडे पशुखाद्याच्या किमती वाढत असताना दुधाचे दर मात्र कमी होत आहेत.आपसातील कुरघोड्यामुळे सरकारचे याकडे लक्ष नसल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, सरकारने जरी शेतकऱ्यांना वा-यावर सोडले असले तरी भाजप शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शेतक-यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे मुंडे यावेळी म्हणाले.

यावेळी कचरु चोथे, वाय. डी. कोल्हे, नितीन फुंदे,
तुषार वैद्य, सूरज लांडे, किरण काथवटे, आखेगावचे सरपंच बाबासाहेब गोरडे, वडुले खुर्दचे सरपंच बाळासाहेब आव्हाड, गंगा खेडकर, सुरज लांडे, मंगेश पाखरे यांच्यासह भाजपाचे  कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Shevgaon, there was anti-government sloganeering