शिर्डी : अनाथाश्रमाच्या मायेतून जुळले नवे ऋणानुबंध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Love Marriage

शिर्डी : अनाथाश्रमाच्या मायेतून जुळले नवे ऋणानुबंध

शिर्डी : प्रेमविवाह केल्याने माहेरचे दरवाजे बंद झाले. काही वर्षांत पती व्यसनाधिन झाला अन मारहाण करू लागला. मदत मागायची कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला. छळ असह्य झाल्याने धुळे जिल्ह्यातील या महिलेने घर सोडले. येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश दळवी यांच्या हक्काचे माहेर या प्रकल्पात तिला आश्रय मिळाला. मात्र पोटची दोन मुले आणि पतीची आठवण बैचेन करू लागली. शोध घेत पती न्यायला आला. त्यापुढे त्रास देणार नाही म्हणाला. त्यावर विश्वास ठेवून तिने पुन्हा घरची वाट धरली. पुरता कोंडमारा झालेल्या या महिलेची फरफट उपस्थितांना अस्वस्थ करून गेली.

पोलिसांच्या समोर नवऱ्याने मी पुन्हा दारू पिणारा नाही, असे म्हणताच त्यावर विश्वास ठेवून तिने त्याच्या सोबत जाणे पसंत केले. आपल्या दोन लहान मुलांत जीव गुंतला होता. ती जाताना म्हणाली, ते जीव लावतात. मात्र त्यांनी दारू पिऊ नये. माझ्यावर शंका घेऊ नये. माझे दुसरे काहीच म्हणणे नाही. मात्र मला आता शिर्डीत हक्काचे माहेर मिळालेय. पुन्हा त्रास झाला, तर येथे आश्रयाला येईन.

गेल्या दहा दिवसांत येथील मंडळींनी मोठा आधार दिला. येथील प्रत्येकाची दुःखे वेगवेगळी. त्यामुळे आपण एकटेच दुःखी नाहीत, याची जाणीव झाली. जीवाभावाच्या माणसासारखी वागणूक मिळाली. त्यामुळे येथे येत राहील. जाताना दळवी यांच्या मातोश्री आशाबाई यांनी साडी-चोळी देऊन या महिलेची ओटी भरली. त्यावेळी तिला अश्रू अनावर झाले. या अनाथाश्रमात बावीस निराधार महिला, शंभराहून अधिक अनाथांचा सांभाळ केला जातो.

पतीची व्यसनाधिनता, संशयी स्वभाव आणि अन्य कारणांनी काही कुटुंबांत घरातील महिलांचा छळ केला जातो. त्रास असह्य झाला की त्यांना घर सोडण्याशिवाय पर्याय राहात नाही. हक्काचे माहेर या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही त्यांना आधार देतो. आजवर पोलिसांच्या सहकार्याने अशा बारा पीडित महिलांना दोन्ही बाजूंचे समुपदेशन करून घरी पाठविण्यात आले आहे.

गणेश दळवी, संचालक, साई आश्रया अनाथाश्रम, शिर्डी