पुंडलिक वरदे.. हरि विठ्ठलच्या नामघोषात ज्ञानेश्वर मंदिराचे 'दार' उघडले

सुनील गर्जे
Tuesday, 17 November 2020

पुंडलिक वरदे... हरि विठ्ठल... श्री ज्ञानदेव... तुकाराम...च्या जयघोषात श्री क्षेत्र नेवासे येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनस्थान "पैस" खांब असलेले ज्ञानेश्वर मंदिर मंदिराचे प्रमुख विश्वस्त गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते उघडण्यात आले.

नेवासे (अहमदनगर) : पुंडलिक वरदे... हरि विठ्ठल... श्री ज्ञानदेव... तुकाराम...च्या जयघोषात श्री क्षेत्र नेवासे येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनस्थान "पैस" खांब असलेले ज्ञानेश्वर मंदिर मंदिराचे प्रमुख विश्वस्त गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते उघडण्यात आले. दरम्यान राज्य सरकारने मंदिरे खुले करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वारकरी भक्त, संत- महंत व कीर्तनकार यांच्यामध्ये उत्साह दिसून आला.

कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या साडेसात महिन्यापासून बंद असलेल्या ज्ञानेश्वर मंदिराचे मुख्यद्वाराचे कुलूप  देशमुख महाराजांनी उघडले. यावेळी महाराष्ट्र वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. नंदकिशोर महाराज खरात, ह. भ. प. गहिनीनाथ महाराज आढाव, शिवाजी होन, भिकाजी खोसे, सुधीर चव्हाण, आशिष कावरे, जालिंदर गवळी, भानुदास गटकळ, संदीप आढाव, गोरख भराट उपस्थित होते.

यावेळी गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात माऊलींचे मूर्तींमंत रूप असलेल्या 'पैस' खांबास विधिवत पूजन अभिषेक घालण्यात आला.  मंदिरात भाविकांनी प्रवेश करताच तब्बल साडेसात महिन्यानंतर 'घंटां'चा निनाद व हरिनामाचा जप ऐकावयास मिळाल्याने येथील वातावरण मंगलमय झाले होते.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिवाजी महाराज देशमुख म्हणाले, "कोरोनाच्या महामारीमुळे साडेसात-आठ  महिन्यानंतर मंदिरे उघडण्याचा राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही वारकरी संप्रदायाचे वतीने स्वागत करतो. मंदिरे उघडल्याने कोरोनाशी सामना करतांना भक्तांना भगवंताच्या दर्शनाने आत्मिक बळ व सामर्थ्य प्राप्त होईल, भगवंताला आपल्या भक्तांची काळजी असल्याने कोरोनाचे संकट ही लवकर जावो म्हणून आपण प्रार्थना करणार आहोत.

माऊलींचे व पैस खांबाचे दर्शन घेतांना भाविकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, मास्क लावूनच दर्शन घ्यावे अन्यथा नो मास्क नो दर्शन ही नियमावली केली जाईल असे सांगून त्यांनी कोरोनाचे संकट अजून ही गेलेले नसल्याने सर्वांनी नियमांचे पालन करत सामाजिकअंतर ठेवत पालन करावे, असे आवाहनही यावेळी देशमुख महाराज यांनी भाविकांना केले.

अभिनव त्यागींचे 'पैस' दर्शन
नेवासे पोलिस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी यांनी नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिरास भेट देऊन 'पैस'खांबाचे दर्शन घेतले. दरम्यान त्यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri Sant Dnyaneshwar Mauli temple opened in Nevasa taluka