esakal | नगरमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपमध्ये ‘खुर्ची का मिर्ची’!स्वाक्षऱ्यांच्या मोहीमेची चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

नगरमध्ये विरोधी पक्षनेतेपदाच्या 'खुर्ची'साठी स्वाक्षरी मोहीम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अहमदनगर : महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची सध्या रिक्त आहे. या खुर्चीसाठी भाजपमधील इच्छुक नगरसेवकांत ‘खुर्ची का मिर्ची’ खेळ सुरू झाला आहे. या खुर्चीसाठी शुक्रवारी (ता. १६) मुंबईत प्रदेशाध्यक्षांनी विशेष बैठक बोलाविली आहे. या बैठकीत वजन पाडण्यासाठी दोन इच्छुकांनी नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची महापालिकेत चांगलीच चर्चा आहे. (Signature-campaign-for-Leader-of-Opposition-post-marathi-news)

विरोधी पक्षनेता होण्यासाठी इच्छुकांची स्वाक्षरी मोहीम

महापालिकेत ३० जूनला शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महापौर- उपमहापौर निवडणूक बिनविरोध केली. या नवीन विकास आघाडीच्या कळपात काँग्रेस व बसपचेही नगरसेवक शिरले. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद भाजपला मिळणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे हे पद मिळविण्यासाठी भाजप नगरसेवकांतील इच्छुकांमध्ये खुर्ची मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या खेळात ज्याला खुर्ची मिळणार नाही, त्याला चांगलीच मिरची लागण्याची शक्यता आहे.

भाजपमध्ये ‘खुर्ची का मिर्ची’ खेळ सुरू

विरोधी पक्षनेता ठरविण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता. १६) बैठक बोलाविली आहे. तीत ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले, भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी दोन इच्छुकांनी नगरसेवकांची स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. भाजप नगरसेवकांकडे पाठिंबा म्हणून ते स्वाक्षऱ्या मागत आहेत. काही नगरसेवकांनी, कोणाला वाईट वाटू नये यासाठी दोघांनाही पाठिंबादर्शक स्वाक्षऱ्या दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या संख्येपेक्षा स्वाक्षऱ्यांची संख्या अधिक होण्याची शक्यता आहे. या दोन इच्छुकांनी, तर प्रतिस्पर्ध्यापेक्षा एक तरी सही जास्त आणण्याचा चंग बांधला आहे. काही इच्छुकांनी आपले राजकीय वजन वापरण्यास सुरवात केली आहे. महापालिकेच्या नियमानुसार गटनेत्यालाच विरोधी पक्षनेतेपद मिळते. तथापि, नगर महापालिकेत नियम चालत नसल्याचा इतिहास पाहता, राजकीय गणिते जुळविणाराच खुर्ची पटकावणार आहे.

वाकळे यांचे नाव चर्चेत

भाजपकडून माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर मालन ढोणे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांची नावे चर्चेत आहेत.

हेही वाचा: साईसंस्थान विश्‍वस्तांसाठी निकष बदलणार? अधिसूचना जारी

हेही वाचा: ‘विकेंड’मुळे शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक बदलणार?

loading image