
राहुरी खुर्द येथे शिवकृपा बेकरीत बालमजूर काम करीत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते निलेश जगधने यांना समजली.
राहुरी (अहमदनगर) : राहुरी खुर्द येथे एका बेकरीत काम करणाऱ्या परप्रांतीय तीन बालमजूरांची सामाजिक कार्यकर्त्यांनी सुटका केली. त्यांची आपबिती ऐकून कार्यकर्त्यांनी परप्रांतीय बेकरी चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पीडितांना वेळोवेळी मारहाण, धमकावणे, इच्छेविरुद्ध श्रम करून घेणे, अनैसर्गिक अत्याचार व बालकांचे लैंगिक शोषण अधिनियमान्वये राहुरी पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिराने गुन्हा नोंदविण्यात आला.
अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पवन लल्लन यादव (वय 26, रा. दुधई, ता. तमकुईराज, जि.कुशीनगर, उत्तरप्रदेश, हल्ली रा. राहुरी खुर्द) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला, आज (रविवारी) नगर येथील पोस्को न्यायालयाने येत्या गुरुवार (ता. 21) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राहुरी खुर्द येथे शिवकृपा बेकरीत बालमजूर काम करीत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते निलेश जगधने यांना समजली. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष पिंटू साळवे, अनिल जाधव, संविधान बचाव संघर्ष समितीचे कांतीलाल जगधने, दीपक आव्हाड, नंदू शिंदे, डॉ. जालिंदर घिगे, मयूर सूर्यवंशी, संदीप कोकाटे, चंद्रकांत जगधने, सतीश बोरुडे आदींसह बेकरीत जाऊन, परप्रांतीय अल्पवयीन तीन मुलांची सुटका केली.
पीडित चौदा, पंधरा व सोळा वर्षांच्या मुलांनी त्यांच्यावरील अत्याचाराचा पाढा वाचला. 'बेकरी चालकाने दिवस रात्र झोपू न देता काम करून घेतले. वेळोवेळी दमदाटी, लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ करून, शरीराला चटके दिले. एका अल्पवयीन मुलासोबत वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य करुन, लैंगिक अत्याचार केले' अशी आपबिती सांगितली. त्यामुळे, कार्यकर्त्यांनी परप्रांतीय बेकरी चालकाला राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. बेकरीत काम करणाऱ्या ओमप्रकाश जोखनगिरी गिरी (वय 31, रा. नयना ता. तमकुईराज, जि. कुशीनगर, उत्तरप्रदेश) यांच्या फिर्यादीवरून, बेकरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेश वाघ पुढील तपास करीत आहेत.