सोयाबीन उत्पादकांची चंगळ, हमीभावापेक्षा मिळतोय जादा दर

मनोज जोशी
Tuesday, 27 October 2020

जिल्ह्यातील 11 केंद्रांवर 34 शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली. मात्र, एकाही शेतकऱ्याने आपला माल विक्रीसाठी आणला नसल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापक श्रीकांत आभाळे यांनी सांगितले.

कोपरगाव : शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळावेत, यासाठी सरकारने शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू केली. मात्र, यंदा सोयाबीनला हमीभावापेक्षाही व्यापाऱ्यांकडून जास्त पैसे मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. 

शासनाच्या धोरणानुसार, सोयाबीनला हमीभाव केंद्रावर क्विंटलमागे 3800 रुपये भाव आहे. मात्र, कोपरगाव बाजार समितीमधील व बाहेरील व्यापारी शेतकऱ्यांना चार हजारांपेक्षा जास्त भाव देत असून, रोख पेमेंट करीत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यांतील 11 केंद्रावर शुकशुकाट आहे. कोपरगाव तालुक्‍यात कुठलीही एजन्सी पुढे येत नसल्याने एकही केंद्र सुरू झालेले नाही. हमीभाव केंद्र सुरू करण्याचा आदेश आमदार आशुतोष काळे यांनी बाजार समितीला दिला आहे. मात्र, बाजार समिती मका हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सभापती संभाजी रक्ताटे यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील 11 केंद्रांवर 34 शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली. मात्र, एकाही शेतकऱ्याने आपला माल विक्रीसाठी आणला नसल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापक श्रीकांत आभाळे यांनी सांगितले. शेतकरी सहकारी संघ, कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग हे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे सदस्य असून, पणनची संस्था म्हणून बाजार समितीला असे केंद्र सुरू करता येऊ शकते. मात्र, शासनाचे खरेदीबाबतचे नियम, अटी, तसेच उशिरा होणारे पेमेंट, या मुळे कुठलीही एजन्सी केंद्र सुरू करण्यास तयार होत नाही. 

2018-19मध्ये शेतकरी सहकारी संघाने अध्यक्ष बिपिन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हरभरा खरेदी केंद्र सुरू झाले. मात्र, ऑनलाइन, ऑफलाइन बुकिंगचा गोंधळ, आद्रतेचा प्रश्न, शासनाची चार क्विंटल हरभरा खरेदीची अट, एवढे करूनही शासनाने उशिरा पेमेंट केल्याने एजन्सी हतबल झाली. शेतकरी पेमेंटसाठी चकरा मारत असल्याने, कोल्हे यांनी संघाच्या फंडातून पेमेंट अदा केले होते. 

सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त पैसे मिळत असल्याने खरेदी केंद्रावर येण्यास शेतकरी तयार नाहीत. शेतकऱ्यांच्या हितासाठी "संजीवनी'चे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीने मका हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा फेडरेशनकडे प्रस्ताव पाठविला आहे. 
- संभाजी रक्ताटे, सभापती, बाजार समिती, कोपरगाव 

केंद्रानिहाय शेतमालाची नोंदणी करणारे शेतकरी  
उडीद : कर्जत 7, जामखेड 1, नगर 8, पारनेर 3, पाथर्डी 4, राहुरी 30, संगमनेर, श्रीगोंदे व शेवगाव-शून्य. एकूण खरेदी- 96.50 क्विंटल.  याबीन : जामखेड 2, नगर 7, पारनेर 5, पाथर्डी 1, राहुरी 19, शेवगाव 1, संगमनेर, श्रीगोंदे व कर्जत- शून्य. खरेदी-शून्य. मूग : कर्जत 124, जामखेड 85, नगर 208, पारनेर 70, पाथर्डी 19, राहुरी 110, श्रीगोंदे व शेवगाव प्रत्येकी 2, संगमनेर- शून्य. खरेदी- 1286.13 क्विंटल .

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soybean growers are getting higher rates than guaranteed prices