शाळांच्या थकीत वीजबिलासाठी विशेष निधी

सूर्यकांत नेटके
Friday, 25 December 2020

राज्याच्या शालेय व क्रीडा विभागाने काढलेल्या अभ्यासात ही बाब स्पष्ट केली. त्यात सर्वाधिक 1231 शाळा सोलापूर जिल्ह्यातील असून, नगर जिल्ह्यातील 446 शाळा आहेत.

नगर : ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना भौतिक, शैक्षणिक सुविधेसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांना वीजजोडणी दिली. मात्र, वीजबिले थकल्याने सध्या राज्यातील तब्बल 10 हजार 671 शाळांचा वीजपुरवठा बंद आहे.

सध्या कायमस्वरूपी बंद व चालू मिळून, सुमारे 12 कोटींची थकबाकी शाळांकडे आहे. त्यातील कायमस्वरूपी वीजपुरवठा बंद असलेल्या थकीत देयकासाठी विशेष बाब 5 कोटी 88 लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केले आहेत. मात्र, कायमस्वरूपी वीजपुरवठा बंद असलेल्या शाळांत संगणकांसह इतर बाबीला अडचणी येत आहेत. त्यात नगर जिल्ह्यातील 446 शाळा आहेत. नगरमधील शाळांसाठी 18 लाख 57 हजार रुपये मंजूर झाले आहेत. 

हेही वाचा - मंत्री गडाख यांच्यामुळे शनिची राजकीय साडेसाती हटली

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांना संगणकासह इतर शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रत्येक शाळेला वीजजोडणी देण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांतील ग्रामीण विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळू लागले. शिवाय वीज उपलब्ध झाल्यामुळे इतर साहित्यांचाही वापर होऊ लागला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वीजबिल थकल्याने राज्यातील सुमारे 10 हजार 671 शाळांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला.

राज्याच्या शालेय व क्रीडा विभागाने काढलेल्या अभ्यासात ही बाब स्पष्ट केली. त्यात सर्वाधिक 1231 शाळा सोलापूर जिल्ह्यातील असून, नगर जिल्ह्यातील 446 शाळा आहेत. पुण्यातील 780, सांगलीतील 605, नाशिकमधील 773, औरंगाबादमधील 569 शाळांचा समावेश आहे. 

कायमस्वरूपी वीजपुरवठा बंद असलेल्या शाळांतील वीज सुरू करण्यासाठी शासनाने देयकांसाठी 5 कोटी 88 लाख रुपये विशेष बाब म्हणून तरतूद केली आहे. वीजदेयके थकल्यामुळे शाळांचा वीजपुरवठा बंद असल्याने ग्रामीण भागातील शाळांत अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी निधी देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 

शाळांतील वीजपुरवठा सुरू करण्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून निधी दिला आहे. नगर जिल्ह्यातील वीजपुरवठा बंद असलेल्या शाळांची संख्या मोठी असून, हा निधी कमी आहे. त्यामुळे या निधीत वाढ करावी. सर्व शाळांचा वीजपुरवठा सुरू करावा. 
- राजेश परजणे, जिल्हा परिषद सदस्य, नगर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special funds for school exhausted electricity bills