म्हैसगावच्या सरपंचांची 'अग्नीपरीक्षा'; अविश्‍वास ठरावावर मतदार घेणार निर्णय, ग्रामसभेच्या सर्वोच्च अधिकाराचा वापर

विलास कुलकर्णी 
Tuesday, 1 December 2020

म्हैसगाव ग्रामपंचायतीची तीन वर्षांपूर्वी सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात थेट जनतेतून महेश गागरे यांची सरपंचपदी निवड झाली. परंतु, जनतेने त्यांच्या विरोधातील पॅनेलचे जादा सदस्य निवडून दिले.

राहुरी (अहमदनगर) : तालुक्‍यातील म्हैसगाव येथे लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांच्याविरुद्ध दाखल अविश्वास प्रस्तावावर गुप्त मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी बुधवारी (ता.०२) सकाळी 9 वाजता विशेष ग्रामसभा बोलावली असून, सकाळी साडेदहा वाजता मतदान घेतले जाईल. ग्रामसभेच्या सर्वोच्च अधिकाराचा वापर होण्याची राज्यातील यदाकदाचित ही पहिलीच घटना असेल.
 
म्हैसगाव ग्रामपंचायतीची तीन वर्षांपूर्वी सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात थेट जनतेतून महेश गागरे यांची सरपंचपदी निवड झाली. परंतु, जनतेने त्यांच्या विरोधातील पॅनेलचे जादा सदस्य निवडून दिले. अडीच वर्षांनंतर लोकनियुक्त सरपंचांवर अविश्‍वास प्रस्ताव आणण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यानुसार, विरोधी सदस्यांनी 23 ऑक्‍टोबर रोजी गागरे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित केला. मात्र, विशेष ग्रामसभेत गुप्त मतदान घेऊन लोकनियुक्त सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव पारित झाल्याशिवाय सरपंचपद रद्द ठरविता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. तसा अध्यादेश ग्रामविकास विभागाने काढला. त्यामुळे सरपंचपद टिकविण्यासाठी गागरे यांच्यावर तीन वर्षांत दुसऱ्यांदा घरोघरी फिरण्याची वेळ आली.

मतदारांमध्ये संभ्रम नि उत्सुकता निवडणुकीत असतात, तशी मतपत्रिकेवर उमेदवारांची नावे नसल्याने मतदार संभ्रमात आहेत. अविश्वास ठरावास माझी संमती आहे किंवा अविश्वास ठरावास माझी संमती नाही. एकासमोरील चौकोनात शिक्का मारायचा आहे. याबाबत घरोघरी जाऊन, मतदारांना समजून सांगावे लागत आहे. त्यामुळे मतदारांमध्येही उत्सुकता आहे. गावात एकूण 2280 मतदार असून, पैकी पुणे, सांगली जिल्ह्यातील वीटभट्टीवर 300 मतदार गेले आहेत. शंभरांवर मतदार नोकरी, शिक्षणानिमित्त जिल्ह्याबाहेर आहेत. 

असे होईल मतदान

तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी नऊ विशेष ग्रामसभा सुरू होईल. गणपूर्तीसाठी शंभर लोकांची उपस्थिती असणे आवश्‍यक आहे. मतदार यादीनुसार उपस्थित ग्रामस्थांची सकाळी साडेदहा वाजेपर्यंत नावनोंदणी होईल. ग्रामसभेचा उद्देश, विषय सांगितला जाईल. नंतर जिल्हा परिषद शाळेत दोन केंद्रांवर मतदान होईल. नावनोंदणी केलेल्या मतदारांना मतदानाचा अधिकार असेल. उशिरा आल्यास मतदान करता येणार नाही. दुपारी एक वाजेपर्यंत मतदान पूर्ण होईल. त्यानंतर लगेच मतमोजणी सुरू होईल. साध्या बहुमताने (एक मत जास्त असले तरी) सरपंचपदाचा निर्णय जाहीर केला जाईल. 

म्हैसगाव येथे बुधवारी (ता. 2) विशेष ग्रामसभा व मतदानप्रक्रियेसाठी 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस अधिकारी व 25 पोलिसांचा बंदोबस्त असेल. ग्रामसभेत गुप्त मतदानप्रक्रिया प्रथमच होत आहे. त्यामुळे सर्वांसाठी ही प्रक्रिया नवीन आहे. 
- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A special Gram Sabha has been called in Mahesgaon on Wednesday morning and polling will be held at morning