esakal | 'हनी ट्रॅप' प्रकरणाची विशेष पथकामार्फत चौकशी 
sakal

बोलून बातमी शोधा

 Honey Trap Logo

"व्यापारी, अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रांतील धनिकांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, ब्लॅकमेलिंग करीत लाखो रुपयांना लुटणाऱ्या टोळीचे वास्तव "सकाळ'च्या माध्यमातून समोर आले आहे. या गंभीर प्रकारांची पोलिस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) या तीन विभागांच्या आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष पथकामार्फत युद्धपातळीवर सखोल चौकशी करावी व संबंधितांना जेरबंद करावे,'' अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

'हनी ट्रॅप' प्रकरणाची विशेष पथकामार्फत चौकशी 

sakal_logo
By
अॅड. डाॅ. बाळ ज. बोठे पाटील

नगर : "व्यापारी, अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रांतील धनिकांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, ब्लॅकमेलिंग करीत लाखो रुपयांना लुटणाऱ्या टोळीचे वास्तव "सकाळ'च्या माध्यमातून समोर आले आहे. या गंभीर प्रकारांची पोलिस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) या तीन विभागांच्या आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष पथकामार्फत युद्धपातळीवर सखोल चौकशी करावी व संबंधितांना जेरबंद करावे,'' अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह संबंधितांना विखे पाटील यांनी आज निवेदन पाठवून ही मागणी केली. नगर जिल्ह्याला सहकाराचा व पुरोगामी विचारांचा वारसा आहे. स्वातंत्र्यचळवळीपासून ते आतापर्यंतच्या चांगल्या अनेक उपक्रमांमध्ये जिल्ह्याने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्याच्या अशा वेगळ्या कामांची नोंद देश व जागतिक पातळीवर झाली आहे, असे विखे पाटील यांनी म्हटले आहे. 

तथापि, "हनी ट्रॅप'सारख्या गलिच्छ घटना सुन्न करणाऱ्या व भारतीय संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या आहेत. "सकाळ' समूहाच्या दैनिक सकाळ, सरकारनामा व ई-सकाळ या माध्यमांद्वारे "हनी ट्रॅप'चे प्रकरण देशपातळीवर गाजले. निर्भीड पत्रकारितेच्या परंपरेची झलक "सकाळ'ने पुन्हा दाखवून दिली. समाजविघातक कृत्य करणाऱ्यांवर प्रहार केला. ही बाब निश्‍चित वाखाणण्याजोगी आहे, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. 


विशेष पथकामार्फत याची चौकशी युद्धपातळीवर करावी, संबंधितांचे मोबाईल कॉल डिटेल्स काढून त्याद्वारे पीडितांचा शोध घ्यावा, धैर्याने पुढे येणाऱ्या पीडितांना धीर देत गुन्हेगारांना जेरबंद करून कडक शासन करावे, अशा मागण्या विखे पाटील यांनी केल्या आहेत. 

"त्या'चा ब्रिगेडशी संबंध नाही : दळवी 
"हनी ट्रॅप'च्या गंभीर प्रकरणाचा "सकाळ'ने मोठ्या धाडसाने पर्दाफाश केला. या घटनेतील संशयित आरोपींना चतुर्भुज करायला हवे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आणि छत्रपती रयत ब्रिगेडचे संस्थापक-अध्यक्ष गोरख दळवी यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. प्रकरणातील म्होरक्‍याचा संभाजी ब्रिगेडशी काहीही संबंध नाही. "हनी ट्रॅप'च्या माध्यमातून अनेकांचे प्रपंच अडचणीत आणण्याचे काम करणाऱ्या या नराधमाला फाशी द्यायला हवी. त्याची लफडेगिरी, त्याच्यातील विकृती सर्वश्रुत आहे, असेही दळवी म्हणाले. "सकाळ'ने, या टोळीत खतरनाक गुन्हेगार असल्याचे माहिती असूनही मोठ्या धाडसाने पर्दाफाश केला. त्यामुळे "सकाळ'मधील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या परिवाराच्या जिवाला मोठा धोका आहे. पोलिसांनी त्याची नोंद घेऊन त्यांना संरक्षण द्यावे, असेही ते म्हणाले. 
 
महिलांची भाड खाणारा "राजा'च म्होरक्‍या : संजीव भोर 
"हनी ट्रॅप'च्या माध्यमातून अनेकांचे "पर' ज्याने "काळे' केले, त्या "राजा'ला "सकाळ'ने पुरते उघडे पाडले. बातमी वाचून अनेकांनी फोन केले. महिलांच्या अब्रूशी खेळत त्यांची भाड खाणारा हा म्होरक्‍या प्रमुख भूमिका वठवत आहे. प्रामाणिक समाजकार्य पुढे नेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्यांच्या पायात पाय घातले, त्यांना रोखण्यासाठी व बदनाम करण्यासाठी कारस्थाने रचली, सोशल मीडियात खोट्या पोस्ट फिरविल्या, चांगल्या कार्यकर्त्यांना वादग्रस्त ठरविण्यासाठी हद्दपार करावे म्हणून काही पांढऱ्या बगळ्यांचे व प्रशासनाचे कान भरले, खोटीनाटी निवेदने देण्यात पुढे असणारा हा "राजा' अखेर "सकाळ'मुळे उघडा पडला, असे भोर म्हणाले. या "राजा'ला पोसणाऱ्या व पाठीशी घालणाऱ्यांचे आता तरी डोळे उघडतील, अशी अपेक्षा भोर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.