एसटीच्या प्रवाशांनाही मिळणार आता स्वस्तात शुद्ध पाणी

अशोक मुरुमकर
Tuesday, 3 November 2020

प्रवाशांना सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळ नेहमीच विविध प्रयत्न करते. त्यातच आता एसटी महामंडळ प्रवाशांना शुद्ध पाणी देणार आहे.

अहमदनगर : प्रवाशांना सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळ नेहमीच विविध प्रयत्न करते. त्यातच आता एसटी महामंडळ प्रवाशांना शुद्ध पाणी देणार आहे. स्वस्त दरात हे पाणी उपलब्ध करुन दिले जाणार असून टप्प्याने प्रत्येक बसस्थानकार हे पाणी उपलब्ध केले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रवाशी वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्न करते. ‘नवं ते हवं’ याप्रमाणे एसटी महामंडळ प्रवाशांना सुविधा देते. यापूर्वी एसटीमध्ये प्रवाशांना एक रुपया टाकुन फोन लावता यावा म्हणून ‘पीसीओ’ बसवले होते. काही दिवसांपूर्वी वायफायची सुविधा प्रत्येक बसमध्ये देण्यात आली होती. खासगी वाहतुकीशी स्पर्धा करत प्रवाशांना संगीत ऐकत प्रवास करता यावा म्हणून टेप बसवण्यात आले होते. प्रवाशी हेच आमचे दैवत म्हणत ‘हात दाखवा, बस थांबवा’ हे अभियानही एसटीने अनेक दिवस राबवले. आता एसटी प्रवाशांना कमी दरात शुद्ध पाणी उपलब्ध करुन देणार आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते या योजनेचे उद्‌घाटनही झाले आहे. या योजनेला ‘नाथजल’ असं नाव देण्यात आले आहे. यामध्ये ६५० मिलीमीटर आणि एक लिटरच्या स्वरुपात पाणी देण्यात येणार आहे. ग्राहकांना प्रवासात दर्जेदार पाणी उपलब्ध व्हावे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. "नाथजल" ६५० मिली आणि १ लीच्या स्वरूपात टप्प्याटप्प्याने प्रत्येक बसस्थानक वर उपलब्ध होणार आहे.

याच्या उद्‌घाटनावेळी निलेश शेळके, राज्य परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष अविनाश ढाकणे उपस्थित होते. यावर्षी कोरोना व्हायरसमुळे एसटी तोट्यात गेली आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक दिवस एसटी बंद होती. जिल्हा बंदीचा आदेश असताना काही ठिकाणी कोरोनाचा प्रदुर्भव कमी होता त्या ठिकाणी काही तालुक्यात एसटी सुरु होती.

लॉकडाऊनमध्ये सरकारने शिथीलता आणल्यानंतर टप्प्याने एसटी सुरु झाली. अजूनही एसटी पुर्ण क्षमतेनी सुरु झालेली नाही. मात्र, पुन्हा एसटीची चाके गती घेण्याच्या मार्गावर आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST passengers will also get cheap pure water now