वाघ्या मुरळी परिषदेचे उदयन गडाख यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

लोककलावंत वाघ्या मुरळी यांच्या विविध मागण्या त्वरित मान्य होऊन बंद पडलेल्या या कलेतील कलाकारांचे प्रश्न मार्गी लागावेत या मागणीचे निवेदन नेवासे तालुका वाघ्या मुरळी परिषदेच्या सदस्यांनी युवानेते उदयन गडाख यांना दिले आहे.

सोनई (अहमदनगर) : लोककलावंत वाघ्या मुरळी यांच्या विविध मागण्या त्वरित मान्य होऊन बंद पडलेल्या या कलेतील कलाकारांचे प्रश्न मार्गी लागावेत या मागणीचे निवेदन नेवासे तालुका वाघ्या मुरळी परिषदेच्या सदस्यांनी युवानेते उदयन गडाख यांना दिले आहे.

वाघ्या मुरळी यांना उदरनिर्वाहासाठी विशेष निधी अनुदान मिळावे. पाल्यांचे शिक्षण मोफत व्हावे, लोककलेस शासन दरबारी अधिकृत मान्यता मिळावी, पेन्शन योजना त्वरित लागू करावी, कोरोनाच्या नियमांचे पालन करून लोककलावंतांना कुलाचाराचे कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी वाघ्या- मुरळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष भास्कर मासाळ, तालुकाध्यक्ष लक्ष्मण नजन, संतोष पाचे, श्रीरामपुर तालुकाध्यक्ष एकनाथ मासाळ, किशोर साळवे, गणपत बोरुडेसह जिल्ह्यातील कलावंत उपस्थित होते.

गडाख यांनी वाघ्या, मुरळी हे वर्षभर आपल्या कलेने समाज जागृतीचे काम करतात खऱ्या अर्थाने ते अल्प मानधनात मोठे काम करतात. त्यांनाही कुटुंब आहे, त्यांना व त्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य व आधार मिळणे आवश्यक आहे. त्यांच्या मागण्या न्याय स्वरूपाच्या आहेत. या प्रश्नांकरीता शासनदरबारी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने पाठपुरावा करण्यात येईल, असे अश्वासन दिले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Statement to Udayan Gadakh of Waghya Murali Parishad