दिव्यांगत्वावर मात करून 65 किल्ले सर; केशव भांगरे यांची कथा, एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी सज्ज

शांताराम काळे
Friday, 2 October 2020

दिव्यांग असल्याने रतनगड किल्ल्यावर शिक्षक वडिलांनी सहलीला नेले नाही, याची सल मनात ठेवून, एका अवलियाने आठच दिवसांत आपल्या चार मित्रांना एकत्र करून रतनगड गाठले.

अकोले (अहमदनगर) : दिव्यांग असल्याने रतनगड किल्ल्यावर शिक्षक वडिलांनी सहलीला नेले नाही, याची सल मनात ठेवून, एका अवलियाने आठच दिवसांत आपल्या चार मित्रांना एकत्र करून रतनगड गाठले. वयाच्या 11व्या वर्षापासून जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास या त्रिसूत्रीचा वापर करून, दिव्यांगत्वावर मात करीत आजपर्यंत 65 अवघड किल्ले सर केले. कळसूबाईसारख्या उंच शिखराला गवसणी घातली. ही गोष्ट आहे केशव किसन भांगरे या दिव्यांग अवलियाची. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तालुक्‍यातील केशव किसन भांगरे शिक्षण विभागात कार्यरत आहेत. वयाच्या पाचव्या वर्षी दिव्यांगत्व आले तरी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर राज्यातील 65 अवघड गड-किल्ले त्यांनी पादाक्रांत केले. आज चाळिशीत असलेले केशव एव्हरेस्ट सर करण्याची इच्छा बाळगून दर पंधरा दिवसांनी ट्रेकर मित्रांसमवेत गिर्यारोहणाचा छंद जोपासत आहेत. रतनगड, कळसूबाई, पट्टा किल्ला, अलंग- कुलंग- मलंग, आजोबा, पाभरगड, घनचक्कर डोंगर, कोंबड किल्ला, कलाद गड, कुंजीरगड, भैरोबा, कोकणकडा आदी तालुक्‍यातील 20 गड, तसेच राज्यातील सज्जनगड, पन्हाळा, रायगड, शिवनेरी, अंजनेरी पर्वत, असे 45 गड-किल्ले सर करून त्यांनी आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण केली आहे. त्यांचे मित्र व मार्गदर्शक जॉकी साळुंखे यांच्यासह निसर्गप्रेमींबरोबर केशव आपला प्रवास करतात. 

हेही वाचा : नगरच्या पवार बंधुचा ‘कार’नामा; जुन्या टू व्हीलरपासून बनवली फोर व्हीलर
पावसाळ्यात माळशेज घाटाच्या अलीकडील मुख्य डोंगररांगांपासून बाहेर आलेला भैरवगड आहे. चढाईच्या मध्यावर असलेल्या गुहेपासून पायऱ्या उद्‌ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे येथे दोराच्या साहाय्याने चढावे लागते. पुढील मार्गावर ताशीव कातळकडा, तर दुसऱ्या बाजूला खोल दरी थरकाप उडवते. त्यामुळे येथील प्रवास जीव मुठीत धरूनच करावा लागतो. सुमारे एक हजार फूट लांब, पन्नास फूट रुंद व अडीच हजार फूट उंच, असा भिंतीसारखा हा डोंगर पाऊस व जोरदार वाऱ्याशी लढत देऊन केशव यांनी यशस्वीपणे सर केला व 65 गड सर केल्याचे समाधान मिळविले. 165 निसर्गस्थळे त्यांनी पालथी घातली असून, आता ते एव्हरेस्ट सर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

आयुष्यात दिव्यांगत्व आल्याने मी डगमगलो नाही. लहानपणी वडिलांनी मला सहलीला नेले नाही. ही गोष्ट माझ्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. रतनगड माझ्या जीवनाला परीसस्पर्श करून गेला व वडिलांनी मला माझे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी दिली. 
- केशव भांगरे 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The story of handicap Keshav Bhangare climbing the fort