
अहमदनगर महानगरपालिकेच्यावतीने शहरात प्लॅस्टिकबंदी काटेकोर
अहमदनगर - महानगरपालिकेच्यावतीने शहरात प्लॅस्टिकबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने उपायुक्त यशवंत डांगे यांनी सोमवारी (ता. ४) शहरातील व्यापाऱ्यांची महानगरपालिकेत बैठक घेतली. सात दिवसांत आपल्याकडे उपलब्ध प्लॅस्टिक पिशव्यांची माहिती द्या, अशा सूचना डांगे यांनी व्यापाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर १० जुलैपासून शहरात प्लॅस्टिकबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दुकानांमध्ये कॅरिबॅग आढळून आल्यास पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येणार असल्याचे डांगे यांनी स्पष्ट केले.
शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा (कॅरिबॅग) सर्रास वापर होत आहे. त्यामुळे पर्यावरणासह आरोग्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी करिबॅगचा खच पडलेला दिसतो. एवढेच नाही, तर घरोघरी मोठ्या प्रमाणात कॅरिबॅगचा वापर केला जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारने १ जुलै २०२२ पासून प्लॅस्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या महानगरपालिका प्रशासनाने शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कॅरिबॅग विक्री व वापर तत्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या या बैठकीसाठी शहरातील सुमारे दीडशे व्यापारी उपस्थित होते. प्रत्येक दुकानदाराने त्यांच्याकडे कॅरिबॅगचा किती साठा उपलब्ध आहे, याबाबतची माहिती महानगरपालिकेला देण्याच्या सूचना उपायुक्त डांगे यांनी बैठकीत दिल्या. प्लॅस्टिक वस्तूंचे उत्पादन, व्यापार, साठा, वितरण, विक्री, आणि वापर यांवर बंदी आहे. येत्या १० जुलैपासून त्याची शहरात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दुकानांमध्ये कॅरिबॅग आढळून आल्यास संबंधित दुकानदाराला जागेवरच पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे.
Web Title: Strict Implementation Of Plastic Ban In City Ahmednagar Municipal Corporation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..