Success Story ः अण्णा हजारेंच्या ड्रायव्हरने शेतीत केली कमाल; जो तो म्हणतोय वारे पठ्ठ्या!

एकनाथ भालेकर
Friday, 22 January 2021

संदीप पठारे हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाहनावर अनेक वर्षांपासून ड्रायव्हर आहेत. इतर वेळ त्यांनी शेतीसाठी गुंतवला आहे. ती शेती अशी अफलातून आहे की कोणीही म्हणेल वा.

राळेगणसिद्धी : गावाकडे शेती आहे. परंतु नोकरी पुण्या-मुंबईत किंवा बाहेरगावी असते. दुसरं म्हणजे मनुष्यबळाचा अभाव असतो. त्यामुळे कसायची अडचण असते. परंतु ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गाडीवरील चालकाने कमालच केलीय. त्याची शेती पहाल तर कोणीही म्हणेल वारे पठ्ठ्या. रिमोटवर असतंय त्याचं सगळं.

दुसरी कमालाची गोष्ट म्हणजे त्याने ही शेती भाडेपट्ट्याने घेतलीय बरं का... आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार मुद्दाम त्याची शेती पहायला गेले. आणि त्यांनाही त्याचं नवलं वाटलं. मग म्हणाले, शेती करावी तर अशी.

राळेगण सिद्धी शेजारील पानोली गावाच्या शिवारात संदीप यांची ही आधुनिक शेती आहे. पोपटराव पवार काल (गुरुवारी) संदीप यांच्या शेतीवर गेले होते.

संदीप पठारे हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाहनावर अनेक वर्षांपासून ड्रायव्हर आहेत. कोरोना काळात जून 2020मध्ये हजारे यांच्या वाढदिवशी राळेगण सिद्धी अॅग्रो लिमिटेड या कंपनीची स्वतः स्थापना केली. त्यांनी पानोलीतील सैन्य दलात असणाऱ्या चंद्रकात शिंदे यांची अडीच एकर शेती आहे.

या शेतीत मशागत करून, खतांचा वापर करून तेथे तैवान पिंक पेरूची 1 हजार 900 झाडांची 6 बाय 10 फुटांवर लागवड केली आहे. गोल्डन सीताफळाची झाडे ही लावली आहेत. पाण्याच्या बचतीसाठी ठिबकची व्यवस्था करून आंतरपीक म्हणून डांगर भोपळ्याची लागवड केली आहे.

तंत्रज्ञानाची कास धरून संपूर्ण शिवारात सीसीटीव्ही कॅमेरे, सौरसंच बसविले आहेत. सौरऊर्जेचा वापर करून शेतातील विहिरीतील पाणी ठिबकद्वारे फळझाडांना व भोपळ्याला दिले जाते. विहिरीतील पाणी कमी झाले किंवा विजेचा दाब कमी झाला तरी संदीप यांच्या मोबाईलवर संदेश येतो. पाण्याची बचत व्हावी म्हणून ठिबक सिंचनाची व्यवस्था केली आहे. यासाठी आतापर्यंत  चार लाख रूपये खर्च झाल्याचे संदीप यांनी ई सकाळशी बोलताना सांगितले.

हेही वाचा - आधार कार्ड लिंक नसेल तर मिळणार नाही कोणताच लाभ

संदीपने शेतीत पिके, पाणी, वेळ यांचे जे नियोजन केले आहे, ते खूप महत्त्वाचे आहे. संदीपचा लहान भाऊ प्रदीप याचेही बीएस्सी ऍग्रीचे शिक्षण झाले आहे. तोही सुट्टीवर आल्यावर शेतीत मार्गदर्शन करीत असतो. नवनवीन प्रयोगांची माहिती देत असतो.

आतापर्यंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, सहाय्यक आयुक्त डॉ. गणेश पोटे, माजी सरपंच लाभेष औटी आदी मान्यवरांसह अनेक जण भेट देऊन संदीपचे कौतुक करीत आहेत. 

 

पेरू व सीताफळामध्ये आंतरपिक म्हणून लावलेले डांगर भोपळ्याचे पीक चांगले जोमात आहे. डांगर भोपळ्याचे पीक तीन महिन्यांत हाती येते. आणखी दीड महिन्यानंतर डांगर भोपळ्याचे पीक हातात येऊन त्याची विक्री केल्यानंतर आतापर्यंत झालेल्या खर्चाएवढे चार लाखांचे उत्पन्न मिळेल, अशी आशा आहे. पेरू व सीताफळांतून मिळणारे उत्पन्न हे बोनस असणार आहे.

– संदीप पठारे, तरूण शेतकरी, अण्णांचे ड्रायव्हर

संपादन - अशोक निंबाळकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success Story: Modern Farming of Anna Hazare's Driver