उतारा सात-आठवरच अडखळल्याने साखर कारखाने अडचणीत

सतीश वैजापूरकर
Thursday, 10 December 2020

उर्वरीत रकमेची तफावत भरून काढणे ब-याच कारखान्यांना शक्य होत नाही. त्यातून अर्थिक पेचप्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. ज्या कारखान्यांकडे उप पदार्थ निर्मीतीचा स्त्रोत आहे.

शिर्डी ः नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाचा पहिला महिना संपला. तरीही सरासरी साखर उतारा सात ते आठ टक्क्यांच्या पुढे जात नाही. त्यामुळे कारखान्यांचे अर्थकारण गोत्यात पुरते आले. उत्पादीत साखर पोत्यांच्या तुलनेत शेतक-यांची देय रक्कम अधिक. अशी विचित्र परिस्थीती निर्माण झाली.

हेही वाचा - शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मिळाले चौदा कोटी

साखर उता-यात लवकर सुधारणा झाली नाही तर काय करायचे. अशी चिंता साखर कारखान्यांच्या धुरिणांना सतावू लागली आहे. अतिवृष्टीमुळे उसाचे वजन वाढले. मात्र, साखरचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे हे नवे संकट निर्माण झाले आहे.

यंदाच्या हंगामातील जवळपास विस टक्के गाळप पूर्ण झाले. मात्र साखर उता-यात सुधारणा झालेली नाही. नगर जिल्ह्यात आडसाली उस नगण्य आहे. अधिक वजन व लवकर पक्व होत असल्याने शेतक-यांनी 0265 या उसाची लागवड अधिक केली आहे. हा उस तेरा महिन्यातच पक्व होतो. मात्र यंदा अतिवृष्टीमुळे जमिनीतील ओल कमी होण्याचे नाव घेत नाही.

उसात पाण्याचे प्रमाण अधिक आणि साखरेचे प्रमाण कमी आहे. त्यातच थंडीचे प्रमाण कमी झाल्याने उसात साखर तयार होण्याची क्रीया मंदावली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून कारखान्यांचा सरासरी साखर उतारा सात ते आठ टक्क्यांच्या पुढे जायला तयार नाही. मुळात 0265 या उस वाणाचा साखर उतारा 80032 या वाणाच्या तुलनेत कमी आहे. 

किमान दहा टक्के साखर उतारा असला तर जेवढा उस गाळला जातो त्याप्रमाणात साखर पोत्यांचे उत्पादन होते. सध्या गळीत केलेल्या उसाची किंमत आणि त्यातून उत्पन्न होणा-या साखरेच्या किंमतीत विस ते पंचवीस टक्क्यांची तफावत निर्माण झाली.

ही तुट कशी भरून काढायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थशास्त्राच्या भाषेत याला तरलता म्हणतात. हि तरलता निर्माण झाल्याने शेतक-यांची देणी देण्यासाठी जिल्हा सहकारी बॅंकेकडून साखर पोत्यावर उचल कशी उचलायची हा आणखी एक नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे गळीत हंगामाच्या पहिल्या पंधरवाड्यात एक दोन कारखान्यांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील एकाही कारखान्याला उत्पादकांना देणी देणे शक्य झाले नाही. 

जिल्हा बॅंक साखरेच्या एका पोत्याची किंमत 3100 रूपये गृहित धरून त्यावर 2635 रूपये उचल देते. कारखान्याच्या पदरात 2135 रूपये पडतात. त्यातून उत्पादकांना देण्यासाठी 1885 रूपये प्रतिटन रक्कम शिल्लक रहाते. प्रत्यक्षात एफआरपीची रक्कम 2500 रूपये प्रतिटन द्यायची आहे.

उर्वरीत रकमेची तफावत भरून काढणे ब-याच कारखान्यांना शक्य होत नाही. त्यातून अर्थिक पेचप्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. ज्या कारखान्यांकडे उप पदार्थ निर्मीतीचा स्त्रोत आहे. ते कारखाने या संकटकाळात हि तुट भरून काढू शकतात. निव्वळ साखर उत्पादन करणा-या कारखान्यांचे अर्थकारण संकटात आले आहे. 

आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने यंदा पहिल्या पंधरवाड्यात गळीताला आलेल्या उसाला प्रतिटन 2500 रूपये प्रमाणे रक्कम अदा केली आहे. सध्याच्या अर्थिक संकटात उत्पादकांना त्वरेने देणी अदा करणाला हि नगर जिल्ह्यातील पहिला साखर कारखाना ठरला आहे.

 

आडलासी उसाचे क्षेत्र अत्यल्प आणि अतिवृष्टीमुळे जमिनीत ओल आहे. साखर उतारा घटण्यामागचे हे प्रमुख कारण आहे. थंडी वाढली आणि ओल कमी झाली की परिस्थीती बदलू लागेल. सध्या कारखाने अर्थिक अडचणीत सापडले हे वास्तव आहे. 
- पी.बी.भातोडे, निवृत्त कार्यकारी संचालक, गणेश सहकारी साखर कारखाना , अहमदनगर

संपादन - अशोक  निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugar factories in Nagar district in trouble