सुगरण पक्षी झाला अपग्रेट, आता बांधते चार-पाच मजली खोपा

आनंद गायकवाड
Thursday, 17 September 2020

मादीला घरटे पसंद पडले तर ती त्याला प्रतिसाद देत घरट्यावर येऊन बसते मग उर्वरीत घरटे दोघे मिळून पूर्ण करतात. बहुतेक पक्ष्यांच्या घरट्यांना वरून प्रवेशद्वार असते. मात्र, सुगरणीच्या खोप्याचा दरवाजा खालच्या बाजूने पोकळीतून असतो.

संगमनेर ः खोप्यामधी खोपा सुरगणीचा चांगला.. देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला... अशा शब्दांत सुगरणीच्या कौशल्याला शब्दबध्द करणाऱ्या ग्रामीण कवयित्री बहिणाबाईंमुळे सुगरणीचा खोपा सर्वपरिचीत आहे.

पक्ष्यातील कुशल अभियंता असलेल्या सुगरण पक्ष्याच्या अद्वितीय कलाकुसरीची दाद न देणारा शोधूनही सापडणार नाही. माणसं बदलली तशी सुगरणही बदलली आहे.

सुगरणीचा जुन ते सप्टेंबर महिना विणीचा हंगाम असतो. या काळात मादीला आकर्षित करण्यासाठी नर पक्षी आकर्षक घरटे विणतो. या साठी नारळाच्या झावळ्या, बाजरी, मका, उसाच्या पानांच्या बारीक तंतूंचा उपयोग केला जातो. अर्धेअधिक घर घरटे पूर्ण झाल्यावर तो मंजुळ शिळ घालीत, पंखांची फडफड करीत मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो.

मादीला घरटे पसंद पडले तर ती त्याला प्रतिसाद देत घरट्यावर येऊन बसते मग उर्वरीत घरटे दोघे मिळून पूर्ण करतात. बहुतेक पक्ष्यांच्या घरट्यांना वरून प्रवेशद्वार असते. मात्र, सुगरणीच्या खोप्याचा दरवाजा खालच्या बाजूने पोकळीतून असतो.

मादी तिची अंडे उबविण्याची जागा स्वतः तयार करते. प्रत्येक नर साधारणपणे 2 ते 10 घरटी बांधतो. या सर्व माद्या पिलांची चारा पाण्याची तसेच त्यांच्या संरक्षणाची काळजी घेताना पिलांना उडायलाही तोच शिकवतो.

एकाच झाडाच्या वेगवेगळ्या फांद्याला ही घरटी बघायला मिळतात. मात्र, माणसांच्या जंगलात वावरणाऱ्या या पक्ष्यांनी मानवाच्या बहुमंजिली इमारतीची नक्कल करण्यास सुरवात केली आहे. पारंपरिक घरट्यांची जागा दोन किंवा तीन मजली घरट्यांनी घेतली आहे. जणू काही तोही आता अपग्रेड झाला असावा, असे पक्षी निरीक्षकांचे म्हणणे आहे.

सुगरणीच्या या बहुमजली खोप्याबद्दल ई सकाळने पक्षी अभ्यासक प्रा. सुधाकर कुऱ्हाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी थोड वेगळं मत व्यक्त केलं.

 

सुगरण पक्ष्याने यापूर्वीही असा प्रयोग केल्याचे आढळून आले आहे. पक्षी अभ्यासक सलीम अली यांच्या पुस्तकातही तसे संदर्भ सापडतात. अगदी पाच फूट उंचीपर्यंत ती घरटी आढळली आहेत. पहिला बांधलेला खोपा जर असुरक्षित वाटला तर ती दुसरा बांधते आणि तोही चांगला वाटला नाही तर ती एकेक करीत वाढवित जाते. याच कारणातून खोपा बहुमजली होतो.

प्रा. सुधाकर कुऱ्हाडे, पक्षी अभ्यासक, अहमदनगर.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugaran builds a three-four storey hut

Tags
टॉपिकस
Topic Tags: