अहमदनगर : भार सोसेना अन् लगामही लागेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहमदनगर : भार सोसेना अन् लगामही लागेना

अहमदनगर : भार सोसेना अन् लगामही लागेना

अहमदनगर (बोधेगाव) : शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील काठपाडी नदीपुलावरून ऊसवाहतूक करणारा डबल ट्रॉली ट्रॅक्टर, समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने हुलकावणी दिल्याने नदीपात्रात कोसळला. ही घटना आज (गुरुवारी) पहाटेच्या सुमारास घडली. प्रसंगावधान राखून बाहेर उडी घेतल्याने चालक थोडक्यात बचावला. मात्र, धोकादायक वाहतुकीकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याने सामान्यांचा जीव धोक्यात आला आहे.

शेवगाव-गेवराई मार्गावरून चापडगावमार्गे संत ज्ञानेश्वर साखर कारखान्यासाठी ऊस नेणाऱ्या डबल ट्रॉली ट्रॅक्टरला, पुलावर समोरून भरधाव आलेल्या ट्रॅक्टरने हुलकावणी दिली. पुलावरील धोकादायक खड्डे व समोरील वाहनाला वाचवताना, अतिरिक्त भारामुळे तोल जाऊन ट्रॅक्टरसह दोन्ही ट्रॉली नदीपात्रात उलटल्या. सुदैवाने जीवितहानी टळली.

सध्या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू असल्याने रस्त्यावरून ऊसवाहतूक करणाऱ्या डबल ट्रॉली वाहनांमुळे इतर वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या जीवघेण्या वाहतुकीकडे प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

चालकांत हाणामारी

अपघाताच्या घटनेनंतर दोन्ही ट्रॅक्टरचालकांचे भांडण जुंपले. दोघांनीही आपापल्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले. नंतर दोन्ही गटांत हाणामारी झाली. अखेर ग्रामस्थांनी त्यांना पिटाळून लावले.

"ट्रॅक्टरमधील टेपरेकॉर्डरवर कर्णकर्कश आवाजात गाणी, क्षमतेपेक्षा अतिरिक्त उसाची वाहतूक, वाहनांना रिफ्लेक्टर नसणे, रस्त्यांवरील खड्डे आदींमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. संबंधित विभागाने वेळीच लक्ष देऊन कार्यवाही केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल."

- बाबा पठाण, सामाजिक कार्यकर्ते, बोधेगाव

loading image
go to top