सुरत-हैदराबाद रस्त्याचे सर्वेक्षण पूर्ण, शनिशिंगणापूरबाबत खासदार लोखंडेंची ही सूचना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

या नियोजित महामार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले. लवकरच जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले जाईल. त्यानंतर संबंधितांची बैठक घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.

शिर्डी ः सुरत ते हैदराबाद या नियोजित महामार्गाचे भूसंपादन करण्याची जबाबदारी त्या त्या भागातील प्रांताधिकाऱ्यांवरच सोपवावी. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी. नियोजित महामार्गापासून शनिशिंगणापूरपर्यत स्वतंत्र रस्ता तयार करावा, अशा सूचना खासदार सदाशिव लोखंडे यांनी या महामार्गाच्या अधिकाऱ्यांना केल्या. 

आज त्यांनी येथील सरकारी विश्रामगृहावर या महामार्गाच्या पूर्वतयारीच्या कामांचा आढावा घेतला. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या संभाव्य अडचणींबाबत चर्चा केली. बैठकीस या प्रकल्पाचे कार्यकारी संचालक डी. डी. दिवाण, शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, संगमनेरचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे, तहसीलदार कुंदन हिरे व प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा - याला म्हणतात डेरिंग...सचिवाने स्वतःचाच पगार घेतला वाढवून

खासदार लोखंडे म्हणाले, हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातून येतो. तळेगावदिघे, असिमपूर, लोहारे, कासारे, मिरपूर, सादतपूर, गोगलगाव, हसनापूर, हनुमंतगाव व दुर्गापूर, राहुरी खुर्द, राहुरी बुद्रूक, वांबोरी, ते चांदबिबीचा महाल असा जातो. शिर्डी लोकसभा मतदारसंघात या रस्त्यासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडचणी समाजावून घेणे आवश्‍यक आहे. भूसंपादन करताना शेताचे तुकडे होणे, विहिरी गोठे, रहिवासी इमारती व झाडे यासह त्यांच्या मालमत्तेच्या योग्य ते मुल्यांकन करावे. 

प्रकल्पाचे कार्यकारी संचालक दिवाण म्हणाले, या नियोजित महामार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले. लवकरच जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले जाईल. त्यानंतर संबंधितांची बैठक घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल. यावेळी शिवसेनेचे नितीन औताडे, कमलाकर कोते, सचिन कोते, संजय शिंदे आदि पदाधिकारी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Survey of Surat-Hyderabad road completed