राहुरीच्या उपनगराध्यक्षपदी सूर्यकांत भुजाडी बिनविरोध

विलास कुलकर्णी
Friday, 4 December 2020

उपनगराध्यक्ष पदासाठी भुजाडी यांच्या उमेदवारी अर्जांवर सूचक सुमती सातभाई व प्रकाश भुजाडी यांनी तर; अनुमोदक दिलीप चौधरी व अनिल कासार यांनी सह्या केल्या.

राहुरी : राहुरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सूर्यकांत भुजाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तशी घोषणा करताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून, गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. 

आज (शुक्रवारी) दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी पालिकेच्या सभागृहात बैठक झाली. मागील आठवड्यात मावळत्या उपनगराध्यक्ष राधा साळवे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे, रिक्त पदासाठी निवडणूक झाली.

नगराध्यक्ष अनिता पोपळघट,  गटनेत्या डॉ. उषा  तनपुरे, विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे, नायब तहसीलदार गणेश तळेकर, मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुरे, भारत भुजाडी, दशरथ पोपळघट उपस्थित होते.

उपनगराध्यक्ष पदासाठी भुजाडी यांच्या उमेदवारी अर्जांवर सूचक सुमती सातभाई व प्रकाश भुजाडी यांनी तर; अनुमोदक दिलीप चौधरी व अनिल कासार यांनी सह्या केल्या. त्यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

बैठकीस नगरसेवक  नंदकुमार तनपुरे, संगीता आहेर, नंदा उंडे, ज्योती  तनपुरे, राधा साळवे, मुक्ता  करपे, सोनाली बर्डे, अक्षय तनपुरे उपस्थित होते.

दरम्यान, आज सकाळी माजी खासदार  प्रसाद तनपुरे यांच्या उपस्थितीत जनविकास  आघाडीच्या सर्व नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी सूर्यकांत भुजाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suryakant Bhujadi unopposed as Deputy Mayor of Rahuri