माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 December 2020

महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर 6 एप्रिल 2018 रोजी केडगाव येथे दोन शिवसैनिकांची हत्या झाली. त्यात माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचे नाव निष्पन्न झाले. घटना घडल्यापासून त्या पसार आहेत.

नगर : केडगाव येथील दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी सुवर्णा कोतकर यांच्या अटकपूर्व जामीनअर्जावर जिल्हा सत्र न्यायालयासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने आज त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. 

महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर 6 एप्रिल 2018 रोजी केडगाव येथे दोन शिवसैनिकांची हत्या झाली. त्यात माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचे नाव निष्पन्न झाले. घटना घडल्यापासून त्या पसार आहेत.

दोषारोपपत्रात त्यांना फरार घोषीत केले होते. अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर गुरुवारी (10) आरोपी पक्षातर्फे न्यायालयात बाजू मांडण्यात आली. शुक्रवारी (ता. 11) सरकारी पक्षाने बाजू मांडली. 

हेही वाचा - एकदाच लागवड केली आता नुस्ता पैसाच पैसा

घटनेच्या वेळी उर्वरित आरोपी व सुवर्णा कोतकर एकाच छताखाली होते. त्यांच्या सूचनेनुसारच आरोपी संदीप गुंजाळ याने हा गुन्हा केला. आरोपी सुवर्णा कोतकर यांचे वडील माजी आमदार आहेत. त्या माजी उपमहापौर असून, पती माजी महापौर आहेत.

त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास त्या साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. त्यामुळे जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सहायक सरकारी अभियोक्ता ऍड. केदार केसकर यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने कोतकर यांचा अटकपूर्व जामीनअर्ज आज फेटाळून लावला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suvarna Kotkar's pre-arrest bail application rejected