नेवाशात शिक्षक दिनी काळा दिवस

सुनील गर्जे
Saturday, 5 September 2020

वीस वर्षाहून अधिक काळ विनावेतन  कार्यरत असलेल्या आयटी विषय शिक्षकांना वेतन श्रेणीत वेतन देण्यात यावे. सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. शासकीय कर्मचाऱ्यांना दहा-वीस-तीस वर्षांच्या सेवेनंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी. यासह आदी मागण्यांचा समावेश आहे. 

नेवासे  : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ नेवासे शाखेच्यावतीने आज शिक्षकदिन 'काळा दिवस' म्हणून पाळण्यात येवून तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय 'मौन' पाळून आंदोलन करण्यात आले. 

यावेळी  महासंघाच्यावतीने  तहसिलदारांना यांना निवेदन देण्यात आले.  शिक्षक महासंघाचे शिक्षक नेते प्रा. गोवर्धन रोडे, प्रा. हरिश्चंद्र माने यांच्या नेतृत्वाखाली नेवासे  तहसील कार्यालयासमोर शनिवार (ता. ५) रोजी शिक्षक महासंघाच्या पाच सदस्यांनी सकाळी आकरापासून सायंकाळी पाच वाजेपर्येंत मौन पाळून आंदोलन केले. यावेळी तहसीलचे फौजदारी कारकून उत्तम रासकर यांना निवेदन देण्यात आले. 

हेही वाचा - पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे कोरोना बाधित

निवेदनात मूल्यांकन पात्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना ( घोषित- अघोषित ) प्रचलित धोरणानुसार वेतन अनुदान देणे. केवळ घोषित यादीचा विचार न करता अघोषित यादीतील शिक्षकांना देखील हे वेतन अनुदान देण्यात यावे. दशकाहून अधिक काळ २००२-२००३ पासून वाढीव पदांवर विनावेतन कार्यरत असलेल्या शिक्षकांना देखील पद मंजुरी व वेतन अनुदान देण्यात यावे.

वीस वर्षाहून अधिक काळ विनावेतन  कार्यरत असलेल्या आयटी विषय शिक्षकांना वेतन श्रेणीत वेतन देण्यात यावे. सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. शासकीय कर्मचाऱ्यांना दहा-वीस-तीस वर्षांच्या सेवेनंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी. यासह आदी मागण्यांचा समावेश आहे. 

निवेदनावार महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रा. भारत वाबळे, शिक्षक नेते प्राचार्य छबुराव वराळे, नानासाहेब दहातोंडे, प्रा. गोवर्धन रोडे, प्रा. हरिश्चंद्र माने, प्रा. किशोर निमसे, प्रा. गणेश मोरे, प्रा. शंकर वडागळे यांच्या सह्या आहेत.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher's Day black day in Nevasa