पंचाईतच झाली ः महसूलने वाळूचे वाहन पकडल्याने घेतले पेटवून

सुनील गर्जे
Friday, 4 September 2020

ज्ञानेश्वर मंदिर पाठीमागे टाकलेल्या छाप्यात अवैध वाळू वाहातुक करणारे वाहन पकडले. त्यामुळे वाहनावर कारवाई करू नये यासाठी संबंधित व्यक्तीने हे कृत्य केले.

नेवासे :  महसूल विभागाने  कारवाई करून पकडलेले अवैध वाळू वाहातुक करणारे आपले  वाहन सोडावे यासाठी एका वाळू तस्कराने चक्क तहसीलदार कार्यालयाच्या आवारात स्वतः च्या अंगावर रॉकेल टाकून पेटून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तहसीलदारांसह उपस्थीत कर्मेचार्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. हा प्रकार नेवासे तहसील कार्यालय परिसरात शुक्रवार (ता. ४) रोजी सायंकाळच्या सुमारास घडला. याप्रकरणी संबंधित व्यक्ती विरोधात नेवासे पोलिसांत याप्रकरणी आत्महत्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
या बाबत माहिती अशी, नेवशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा हे श्रीरामपूरहुन आले शासकीय काम आटोपून नेवासेकडे येत असतांना त्यांना खबऱ्यामार्फत नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिर परिसरात प्रवरानदीलगत अवैध वाळू तस्करी चालू असून तेथे वाहानांत वाळू भरीत असल्याची माहिती मिळाली. 

या माहितीवरून  तहसीलदार सुराणा यांनी आपल्या महसूल पथकासह घटनास्थळी जाऊन कारवाई करत वाळूने भरलेला टेम्पो (एम एच 04 8278) पकडला. ते वाहन ताब्यात घेऊन तहसील कार्यालाय परिसरात लावले. दरम्यान सायंकाळी दत्तात्रय आसाराम हिवरे  (वय 28, राहणार मारुती नगर, नेवासे खुर्द) हा हातात रॉकेलने भरलेला द्रॅम हातात घेऊन तहसील कार्यालयात आला. माझी वाळूचे वाहन सोडा अशी मागणी केली. दरम्यान महसूल विभागाने त्यास नाकार दिला असता त्याने हातातील द्रॅममधील रॉकेल अंगावर टाकून पेटून घेण्याचा प्रयत्न केला. 

याच वेळी कार्यालयात उपस्थित असलेले तहसीलदार रुपेश सुराणा व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी हिवरे याला पकडून त्याच्या हातातील ड्रम हिसकावून घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

या प्रकरणी मंडल अधिकारी बी. एन. कमानदार  यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय आसाराम हिवरे यांच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हिवरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

"मिळालेल्या माहितीवरून ज्ञानेश्वर मंदिर पाठीमागे टाकलेल्या छाप्यात अवैध वाळू वाहातुक करणारे वाहन पकडले. त्यामुळे वाहनावर कारवाई करू नये यासाठी संबंधित व्यक्तीने अंगावर रॉकेल टाकून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  संबंधित व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- रुपेश सुराणा, तहसीलदार, नेवासे, अहमदनगर
 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tehsildar caught the sand vehicle and the owner took it and set it on fire