esakal | भरधाव वेगाने निघालेल्या टेम्पोचे निखळले चाक ठरले तरुणांचा काळ
sakal

बोलून बातमी शोधा

Tempo accident at Nevase Fata on Nagar Aurangabad Highway

नगरहून औरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगाने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या    टेम्पोचे निखळून उडालेले चाक रस्त्याचे कडेला आपल्या दुकानाच्या बाजूला बसलेल्या तरुण व्यावसायिकांच्या डोक्यावर वेगाने जाऊन आदळले.

भरधाव वेगाने निघालेल्या टेम्पोचे निखळले चाक ठरले तरुणांचा काळ

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : नगरहून औरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगाने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या    टेम्पोचे निखळून उडालेले चाक रस्त्याचे कडेला आपल्या दुकानाच्या बाजूला बसलेल्या तरुण व्यावसायिकांच्या डोक्यावर वेगाने जाऊन आदळले. त्यात गंभीर जखमी झालेल्या व्यावसायिकाचा तासाभरातच मुत्यु झाला. हा विचित्र अपघात गुरुवारी (ता. 3) रात्री साडेआठ वाजता नगर- औरंगाबाद महामार्गावरील नेवासे फाटा येथे झाला.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संदिप बाळासाहेब जोंधळे (वय ३३, रा. खळवाडी, नेवासे खुर्द) असे अपघातात मृत झालेल्या व्यावसायिकांचे नाव आहे. संदीप याचे नेवासे फाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात नगर- औरंगाबाद महामार्गालागत फळ विक्रीचे दुकान आहे.

गुरुवारी रात्री ते आपल्या बंद दुकानाच्या बाजूला बसले असता औरंगाबादच्या दिशेने भाजीपाला घेऊन जात असलेला टेम्पो भरधाव वेगात  असतांनाच त्याचे नेवासे फाटा येथे राजमुद्रा चौकात डाव्या बाजूचे मागचे एक चाक निखळून ते एक दुकानावर जाऊन आदळले. तर दुसरे काही अंतरावर गेल्यावर वेगाने उडून सुमारे ७० फुटावर रस्त्याच्या बाजूला बसलेल्या संदीपच्या डोक्यावर जावून आदळलले. त्यात संदीप गंभीर जखमी झाला. 

त्याला येथीलच श्वास हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर डॉ.  अविनाश काळे यांनी प्रथमोपचार केले. मात्र प्रकृती खालावल्याने संदीपला नगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी संदीपला मृत घोषित केले. संदीपचा मृतदेह उत्तरीय तापासणीसाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.

संदीपच्या मृत्यूची बातमी समजताच येथील व्यावसायिकांनी आपली दुकाने काहीकाळ बंद ठेवली. सकाळी अकरा वाजात मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान पोलिसांनी संबंधित टेम्पो ताब्यात घेतला असून चालक अपघात होताच फरार झाला आहे. 

मयत संदीप याच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. संदीप एसटी कामगार सेनेचे नेते बाळासाहेव जोंधळे यांचा मुलगा तर सामाजिक कार्येकर्ते संतोष जोंधळे यांचे बंधू होते.

संपादन : अशोक मुरुमकर