पाथर्डीकरांनो सावधान! एकटी महिला दिसताच तो माथेफिरू लगेच घरात घुसतो

राजेंद्र सावंत
Friday, 8 January 2021

मागील 15 दिवसांपूर्वी जय भवानी चौकखालील परिसरातील दोन-तीन कुटुंबांना हा अनुभव आला.

पाथर्डी : पाथर्डीतील महिलांना गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच टेन्शनला सामोरे जावे लागत आहे. एका माथेफिरूमुळे अख्ख्या पाथर्डीकरांना वेठीस धरले आहे. महिलेला एकटे फिरणे मुश्कील झाले आहे.

शहरात गेल्या दीड वर्षापासून अनोळखी माथेफिरू फिरतो. मध्यरात्री दोन ते सकाळी सहा वाजेपर्यंत एकटी महिला पाहून घरात घुसतो. किंवा खिडकीतून छेड काढण्याचा प्रयत्न करतो.

हेही वाचा - सोनू सूदची नगरमध्येही समाजसेवा, मुलांना दिले मोबाईल

मागील 15 दिवसांपूर्वी जय भवानी चौकखालील परिसरातील दोन-तीन कुटुंबांना हा अनुभव आला. त्यानंतर तीन जानेवारीला जुनी पोलिस लाईन, रंगार गल्लीतील एका महिलेबाबत असाच प्रकार घडला. 

काही महिलांनी एकत्र येत, नगरसेविका दीपाली रामनाथ बंग यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. माथेफिरूचे काहीतरी करा, अशी विनवणी केली. दीपाली बंग, सुलभा बोरुडे यांनी आमदार मोनिका राजळे यांची भेट घेतली.

पाथर्डी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक रणजीत डेरे यांना निवेदन देऊन माथेफिरूला अटक करण्याची मागणी केली. सुशीला राठोड, कुसुम देखणे, लीला चिंतामणी, विद्या बरबडे, सुनिता चोथे, सुनिता रोडी, मंगल केदार, सविता क्षीरसागर, नगरसेवक रामनाथ बंग व अनिल बोरुडे आदी उपस्थित होते. 

दरम्यान, आज सकाळी सहा वाजता (स्व.) वसंतराव नाईक चौकात एक महिला स्वच्छता करीत असताना, या माथेफिरूने तिची छेड काढली. महिलेचा सहकारी जवळच असल्याने, त्याने माथेफिरूचा पाठलाग केला. त्याच वेळी एसटी मध्ये आल्याने तो पसार झाला. सकाळी फिरायला बाहेर पडणाऱ्या महिलांनीही हा माथेफिरू पाहिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tension of harassment of women in Pathardi