
कुकडीच्या आवर्तनाचं ठरलं, कोणत्या तालुक्याला किती पाणी?
श्रीगोंदे : कुकडी प्रकल्पातील डाव्या कालव्याचे आवर्तन येत्या ९ मे रोजी सोडण्यात येणार आहे. पिंपळगाव जोगे ठरणातून तीन टीएमसीचा अचल साठा घेण्याचे ठरले आहे. दरम्यान साडेतीन टीएमसीचे हे आवर्तन २८ दिवस चालणार आहे. यातून तीन जिल्ह्यातील पाच तालुक्यांना पाणी व दिवसांचा कोटा ठरवून दिला आहे. त्यातील श्रीगोंद्याच्या वाट्याला साडेसात दिवस येत आहेत.
कुकडी प्रकल्पाचे आवर्तन सुटणार का आणि सुटले तर शेतीला मिळणार यावर मोठा खल सुरू होता. अखेर कुकडीच्या डाव्या कालव्याच्या या आवर्तनाचा मुहुर्त ठरला आहे. ९ मे रोजी ते सोडण्यात येईल. त्यासाठी पिंपळगाव जोगे धरणातील तीन टीएमसी अचल साठा येडगाव धरणात घेण्यात येत आहे.
डिंबे धरणातील काही पाणी येडगावमध्ये सुरू असून माणिकडोहचे पाणीही असेच घेण्यात येणार आहे. आवर्तनाचा कालावधी २८ दिवसांचा असून साडेतीन टीएमसी पाणी त्यासाठी लागणार असल्याचे नियोजन झाले आहे. आवर्तानातील १.८०१ टीएमसीच पाण्याचा प्रत्यक्षात वापर होणार असून उर्वरित पाण्याचा अपव्यय नियोजनात धरला आहे.
हेही वाचा: १०२ वर्षांच्या आजीबाईंपुढे कोरोनाने टेकले गुडघे!
कोणत्या तालुक्यांना मिळणार किती टीएमसी पाणी
करमाळा- आठ दिवस- प्रत्यक्ष मिळणारे पाणी ०.३७६ टीएमसी, कर्जत- दहा दिवस ०.५६० टीएमसी, श्रीगोंदे- साडेसात दिवस ०.६१५ टीएमसी, पारनेर- अडीच दिवस ०.२५० टीएमसी, जुन्नरबाबत स्पष्ट उल्लेख नाही.
दरम्यान हे आवर्तन शेतीचे असल्याचे समजते. तथापि उपलब्ध पाणी कमी असल्याने फळबागांना प्राधान्य देतानाच पाझर तलावात पाणी सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले.
दरम्यान येथील भाजप नेते राजेंद्र म्हस्के यांनी पुणे जिल्ह्यात कुकडी प्रकल्पातून नद्यांवरील बंधाऱ्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत आक्षेप नोंदवित त्याबद्दल याचिका दाखल केलेली आहे. कुकडी आवर्तनाचा निर्णय घेणाऱ्या यंत्रणेने त्यांच्या याचिकेबाबत चर्चा केली. मात्र, रब्बी हंगामात यातील काही पाणी सोडलेले असून आता उन्हाळी हंगामात उरलेले पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
Web Title: The Cycle Will Start From Kukdi Dam On 9th
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..