भुलीचे इंजेक्‍शन देऊन गायींची चोरी; शिवसेनेकडून प्रकार उघडकीस

मनोज जोशी
Monday, 28 September 2020

मोकाट फिरणाऱ्या पशुधनाला भुलीचे इंजेक्‍शन देऊन गायीची चोरी होत असल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे.

कोपरगाव (अहमदनगर) : शहरात मोकाट फिरणाऱ्या पशुधनाला भुलीचे इंजेक्‍शन देऊन गायीची चोरी होत असल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. एका चारचाकी गाडीतून येऊन हे इंजेक्‍शन दिले. त्यानंतर चार गायी गुंगी येऊन पडल्या तर एक वासरू पळवून नेल्याची माहिती पुढे आली. यामुळे तालुक्‍यातील पशुधनाची होणारी चोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. 

चोरी करणारे नेमके कोण याचा छडा पोलिसांनी लाऊन आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. पोलिसांनी यात लक्ष घालावे, अशी प्रतिक्रिया गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने यांनी व्यक्त केली. शहरातील कुलस्वामिनी व्हाईट्‌स शिवारात ही घटना आज पहाटे चारच्या सुमारास घडली. तीन गायीच्या मानेवर इंजेक्‍शन दिल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. चारचाकी गाडीतून एकाने खाली उतरून इंजेक्‍शन दिले.  शिवसेनेचे शहरप्रमुख कलविंदर दडीयाल यांच्या ही घटना लक्षात आली. हे वेगळेच प्रकरण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रत्यक्षदर्शी व गायींचे मालक यांना बोलाविण्यात आले. सुरुवातीस खाजगी व नंतर पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा काटे यांना बोलावण्यात आले होते. 

परिसरात सीसीटीव्ही कॅमरे असून त्यातून तातडीने पशुधनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा छडा लावावा, अशी मागणी होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर फिरणारे मोकाट जनावरांचे मालक हेच या प्रकारास कारणीभूत असून त्यांच्यावही कारवाई करावी. पशुधनाच्या मालकांनी स्वत:ची जनावरे बांधून ठेवावीत, असे पालिका वारंवार सांगते.

शहर शिवसेना गायींची तस्करी प्रकरण गांभीर्याने घेणार असून पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार आहे. पोलिसांनी या सर्व प्रकारांचा छडा लावून कठोर कारवाई करावी, असे कलविंदर दडीयाल यांनी सांगितले.

एकाला गायीला मानेवर इंजेक्‍शन दिल्याचे दिसून येते. तीन गायी गुंगून पडलेल्या होत्या. पशुधनाच्या मालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. 
- डॉ. श्रद्धा काटे, पशु वैद्यकीय अधिकारी, कोपरगाव 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of cows by injection of Bhuli in Kopargaon