चोर लागले देवाच्या मागे, घोडेश्वरी मंदिरातील चांदीच्या मखराचीच चोरी

विनायक दरंदले
Thursday, 19 November 2020

ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सन २०१६मध्ये सतरा किलो चांदी वापरुन चार भागामधे चांदीच्या पत्र्यावर कोल्हापूर येथील कारागिरांनी सुंदर नक्षीकाम करुन मखर तयार केले होते.

सोनई : घोडेगाव (ता.नेवासे) येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवी मंदिरात बसवलेले सतरा किलो चांदीच्या मखराची बुधवारी मध्यरात्री चोरी झाली. या बाबत सोनई पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सन २०१६मध्ये सतरा किलो चांदी वापरुन चार भागामधे चांदीच्या पत्र्यावर कोल्हापूर येथील कारागिरांनी सुंदर नक्षीकाम करुन मखर तयार केले होते. राहुरी येथील  दादासाहेब भडकवाल यांंच्या मार्गदर्शनाखाली चांदीचे काम करण्यात आले होते. चांदीच्या मखराने श्री घोडेश्वरी देवी मखर सुशोभित दिसत होते .

लोकवर्गणीतून घोडेश्वरी मंदीरात सन २०१४ते २०१९पर्यंत चार कोटी रुपयांचे काम झाले आहे. गावाने लोकवर्गणीतून देवी मंदिर व परिसर सुशोभित केला आहे. अकरा लाख रुपये किंमतीची चोरी झाल्यानंतर ग्रामस्थात विश्वस्त व पुजा-याच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

मंदिरात कार्तिक मास निमित्ताने काकडा भजन आरतीसाठी महिला भजनी मंडळाचे भजन चालते. गुरुवारी पहाटे काकडा भजनासाठी जमलेल्या भजनी मंडळाच्या महिलांना मंदिराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले तर आतमध्ये लहान दरवाजातून डोकावून दर्शन घेताना चांदीचे मखर तेथे दिसले नाही .ही माहिती पुजारी आदिनाथ माने यांना सांगण्यात आले.

पहाटे या चोरीची घटना ग्रामस्थांना समजल्यावर येथे भाविकांसह नागरिक जमा होऊ लागले. सकाळी साडे सहा वाजता सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक  रामचंद्र कर्पे यांनी मंदिर परिसर पाहणी केली. तेव्हा चौथ-यावर स्क्रू ड्रायव्हर व पक्कड चोरटे विसरल्याचे आढळून आले.

सकाळी साडेआठ वाजता ठसे तज्ञाचे पथक येऊन काही नमुने  घेऊन गेले. नऊ वाजता श्वान पथक आले. श्वान पथकाने मंदिराच्या ऊत्तर बाजूने असलेल्या लोखंडी दरवाजाकडून चोरटे आल्याचा व पसार झाल्याचा माग काढला मिरी रोडपर्यंत मंदिरापासून जवळच माग निघाला आहे. पोलिस यंत्रणेने तपासकामी पथक रवाना केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of silver makhra from Ghodegaon temple