बिबट्याच्या चर्चेने राशीन परिसर भेदरला; करमाळा तालुक्यात तिघांचा मृत्यू : कर्जतच्या सीमेवर बिबट्याच्या वावर

दत्ता उकिरडे
Tuesday, 8 December 2020

अंजनडोह येथे बिबट्याने महिलेची शिकार केली असून या महिलेचे धड सापडले असून मुंडके गायब आहे. फुंदेवाडी येथील पुरुषाचे मुंडके धडापासून वेगळे केल्याची घटना नुकतीच घडली आहे.

राशीन (अहमदनगर) : राशीनसह परिसरात बिबट्या आल्याची चर्चा जोरात सुरु आहे. शेजारीच असलेल्या करमाळा तालुक्यातील फुंदेवाडी आणि अंजनडोह, चिकलठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या सोशल माध्यमातून वाड्यावस्त्यावर पोहचल्याने राशीनसह परिसर बिबट्याच्या दहशतीने भेदरला आहे. त्यामुळे अक्षरशः सातच्या आत घरात अशी स्थिती राशीन परिसराची झाली आहे.

देशमुखवाडी, चिलवडी, राजेभोसलेवस्ती येथे बिबट्या येऊन गेल्याच्या, पाहिल्याच्या चर्चा जोरात आहेत. सोनाळवाडी आणि पिंपळवाडी शिवारातही बिबट्या दिसल्याचे तेथील ग्रामस्थ सांगत आहेत. एवढे बिबटे अचानक कोठून आले असा सवाल ग्रामस्थ विचारू लागले आहेत. 

अंजनडोह येथे बिबट्याने महिलेची शिकार केली असून या महिलेचे धड सापडले असून मुंडके गायब आहे. फुंदेवाडी येथील पुरुषाचे मुंडके धडापासून वेगळे केल्याची घटना नुकतीच घडली आहे. सोमवारी चिकलठाण ( ता.करमाळा) येथे आठ वर्षीय चिमुरडीचा बळी बिबट्याने घेतला. ऊस तोडणी कामगाराची ही मुलगी होती. करमाळा तालुक्यातील फुंदेवाडी हे गाव कर्जतच्या सीमेवर आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. मानवी रक्ताची चटक लागलेल्या या बिबट्याला जेरबंद करणे हे वनविभागा समोरील मोठे आव्हान आहे.

याबाबत कर्जतचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबिलवाड यांना विचारले असता ते म्हणाले, कर्जत तालुक्यात बिबट्याचे वास्तव्य नाही. लांडग्यांच्या पावलांना लोक बिबटया समजत आहेत. तालुक्यातील निंबे येथे बिबट्याचा मार्ग सापडला असल्याने आम्ही तेथे पिंजरा लावला आहे. तसेच सोलापूर, नगर, आणि बीड जिल्ह्यातील आमच्या विभागाचे सुमारे सव्वाशे अधिकारी व कर्मचारी रात्रीची गस्त घालत आहोत. लोकांना सावध करीत आहोत.

संपादन - सुस्मिता वडतिले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is a lot of talk about leopards in the area with Rashin