२५ हजार लोकसंख्येचे गाव पण बसस्थानक नाही; महिला, मुलीही एसटीची वाट पाहत दुकानांसमोर थांबतात

प्रवीण पाटील
Wednesday, 2 September 2020

बोधेगाव 25 हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातील पूर्वीचे बस्थानक पडल्यानंतर आजही नवीन बसस्थांनकांची व्यवस्था केली गेली नाही.

बोधेगाव (अहमदनगर) : अनेक दिवसांपासूनची बोधेगाव बसस्थानकाची मागणी प्रलंबित आहे. आजही प्रवाशांना रस्त्यावरील व्यावसायिकांच्या दुकांनासमोरील पढवीचा आधार घेवून बसची वाट पाहत थांबावे लागत आहे. संबंधित विभागाने तातडीने येथे सुसज्ज बसस्थानक उभारुन प्रवाशांची होणारी गैरसोय दुर करावी, अशी मागणी बोधेगाव परीसरातील प्रवाशी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
 
बोधेगाव 25 हजार लोकसंख्येचे गाव आहे. सहकारी साखर कारखाना, मोठ- मोठी हायस्कूल व महाविदयालये आहेत. तसेच शेतीपासून ते घर बांधकामापर्यत काहीही लागत असले तरी गेवराई, पाथर्डी, पैठण व शेवगाव तालक्यातील मिळून 80 ते 90 गाव- खेड्यातील ग्रामस्थ रोज बोधेगाव बाजारपेठेत काहीना- काही खरेदी करण्यासाठी येथे येत असतात. त्यामुळे बस थांबण्याच्या ठिकाणी प्रवाशांची गर्दी होते. 

गावातील पूर्वीचे बस्थानक पडल्यानंतर आजही नवीन बसस्थांनकांची व्यवस्था केली गेली नाही. अनेक वेळा बोधेगाव सचिवालयासमोरील जुने सरकारी गोदाम पाडून त्या ठिकाणी असलेल्या 21 गुंठे जागेवर सुसज्ज बसस्थानक करावे, अशी मागणी बोधेगाव ग्रामस्थांची अनेक दिवसापासूनची आहे. परंतु याबाबत अदयाप कोणताही निर्णय झालेला नाही. 

या गावात 2017-18 मध्ये परिवहन मंडळाचे वरिष्ठ अधिकारी येऊन जागा पाहून गेले. मात्र काहीच निर्णय झाला नाही. सध्या कोरोनामुळे बसस्थानक परिसरातील व्यावसायिक प्रवाशांना आपल्या दुकांनासमोर बसण्यास मज्जव करतात. त्यामुळे बस येईल तोपर्यत कुठे बसायचे हा प्रश्न प्रवाशापुढे असतो. एखादे दुकान बंद असेल तर प्रवाशी तिथे बसतात. पण ते दुकान उघडताच त्यांना उठावे लागते. अशी हेळसांड रोज नवनवीन प्रवाशांची बस येईपर्यत सुरु असलेली पहावयास मिळते. त्यातच आजू- बाजूच्या खेड्यापाड्यातील महिला- बालक वृद्ध प्रवाशी प्रवासासाठी जात- येत असतांना, बोधेगाव येथे तासंन-तास बसची वाट पाहत थांबतात. अशा वेळी त्यांच्यासाठी स्वच्छतागृहाची गरज भासते. परंतु व्यवस्थाच नसल्यामुळे शारीरिक त्रास या प्रवाशांना सहन करावा लागतो. 

बोधेगाव येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आकाश दसपुते म्हणाले, सध्या बस थांबते, तिथे बसस्थानकाला पुरेशी जागाच नाही. बोधेगाव व परिसराची लोकसंख्या विचारात घेवून तसेच बोधेगाव भविष्यात तालुका होऊ शकतो. ही बाब विचारात घेवून सचिवालयासमोरील शासकीय गोदामाच्या जागेवर लोणीच्या धरतीवर सुसज्ज बसस्थानक करावे. यासाठी परिवहन मंत्र्यांची भेट घेवून त्यांना निवेदन देणार आहे .
 
संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no bus stand in Bodhegaon in Ahmednagar district